लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : पुढील वर्षीपासून बारावी आणि दहावीची परीक्षा काही दिवस अलीकडे घेण्याची चाचपणी राज्य मंडळाकडून करण्यात येत आहे. नियमित परीक्षा लवकर झाल्याने पुरवणी परीक्षाही लवकर घेतली जाऊ शकते. तसेच, पुढील वर्षी प्रचलित पद्धतीनेच परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.

दर वर्षी बारावीची परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये, तर दहावीची परीक्षा मार्च-एप्रिलमध्ये घेतली जाते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०मध्ये दहावी आणि बारावीला सत्र परीक्षा घेण्याबाबत सुचवण्यात आले आहे. मात्र, दहावी आणि बारावीच्या परीक्षेला सुमारे ३२ लाख विद्यार्थी बसतात. ही संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे सत्रनिहाय परीक्षा घेतल्यास शिक्षक, कर्मचारी आणि राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांचा वेळ हा परीक्षा आयोजन ते निकाल जाहीर करणे यातच जाईल. त्याचा परिणाम शैक्षणिक कामकाजावर होऊ शकतो. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानेही सत्र परीक्षांऐवजी पुरवणी परीक्षेचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने सध्याच्या वेळापत्रकात बदल करून पुढील वर्षी बारावी, दहावीची परीक्षा काही दिवस आधी घेण्याबाबत प्रयत्न आहे. त्यामुळे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात बारावीची परीक्षा सुरू होईल. परीक्षा लवकर झाल्याने निकालही लवकर जाहीर होईल. तसेच पुरवणी परीक्षाही लवकर घेता येईल. हीच प्रक्रिया दहावीची परीक्षा, निकाल, पुरवणी परीक्षेसंदर्भातही होईल, असे गोसावी यांनी सांगितले.

आणखी वाचा-Pune Porsche Accident : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक पोहचले पुणे पोलीस आयुक्तालयात, घडामोडींना वेग

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम आराखडा, अभ्यासक्रम तयार करण्याचे काम राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) करत आहे. त्यानंतर राज्य शासनाकडून पुढील निर्णय घेतला जाईल. राज्य शासनाच्या धोरणानुसार दहावी, बारावीच्या परीक्षांमध्ये बदल केले जातील. मात्र, तोपर्यंत प्रचलित पद्धतीनेच परीक्षा होणार आहे, असेही गोसावी यांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एनटीए, सीईटी सेलशी चर्चा करून बारावीच्या परीक्षेचे नियोजन

राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाकडून (एनटीए) संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य (जेईई मेन्स) दोन सत्रांत घेतली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना दोन वेळा परीक्षा देण्याची संधी मिळते. तसेच राज्यात राज्य समाइक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. त्यामुळे या दोन्ही यंत्रणांशी चर्चा करून बारावीच्या परीक्षेचे नियोजन केले जाईल, असे गोसावी यांनी सांगितले.