पुणे : स्वारगेट  एसटी स्थानकात प्रवाशांचे मोबाइल चोरणाऱ्या चोरट्याला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. चोरलेल्या  मोबाइलची खरेदी करणाऱ्या दुकानदारालाही पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ७ लाख ४३ हजारांचे ४३ मोबाइल, लॅपटॉप असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सतीश ज्ञानेश्वर शिरोळे (वय ३२, रा. दहिटणे, ता.  दौंड) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. शिरोळेकडून चोरलेले मोबाइल संच खरेदी करणारा दुकानदार  मोहमद शाहिद इलियास अन्सारी (वय ३४, रा. अश्रफनगर, कोंढवा) याला अटक करण्यात आली आहे.

स्वारगेट एसटी स्थानकात प्रवाशांचे मोबाइल संच चोरून नेण्याच्या घटना घडल्या होत्या. स्वागरेट पीएमपी स्थानक परिसरात शिरोेळे थांबला होता. त्याच्या संशयास्पद हालचाली तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी टिपल्या. पोलिसांनी हटकल्यानंतर तो पळाला. पोलिसांनी पाठलाग करुन त्याला पकडले. चौकशीत आरोपी सतीश शिरोळे याने स्वारगेट, पुणे स्टेशन परिसरातून तीन मोबाइल संच चोरल्याची कबुली दिली. त्याने ओळखीतील मोबाइल विक्रेता दुकानदार मोहमद अन्सारी याला मोबाइल संचाची विक्री केल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी अन्सारीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४३ मोबाइल,संच, लॅपटॉप जप्त करण्यात आला. शिरोळे सराइत चोरटा असून, त्याच्याविरूद्ध सहा गुन्हे दाखल आहेत.

परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त राहुल आवारे, स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, सहायक निरीक्षक राहुल कोलंबीकर, उपनिरीक्षक रवींद्र कस्पटे, अश्रुबा मोराळे, सचिन तनपुरे, सुजय पवार, दीपक खेंदाड, हर्षल शिंदे, फिरोज शेख, हनुमंत  दुधे, रमेश चव्हाण, प्रशांत टोणपे, संदीप घुले यांनी ही कामगिरी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.