पुणे : मुंबईहून पुण्यातील शाखेमध्ये सोन्याचे दागिने जमा करण्यास आलेल्या कंपनीच्या डिलिव्हरी बॉयला पिस्तुलाचा धाक दाखवून आणि त्याला मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडील ६९ लाख ७० हजार ३६८ रुपयांचे सोन्याचे दागिने असलेले आठ पार्सल चोरट्यांनी जबरदस्तीने चोरून नेले. याबाबत अंबे एक्सप्रेस लॉजिस्टिक कंपनीचे व्यवस्थापक प्रथमेश माने (वय २८, रा. अंधेरी) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी दोघा चोरट्यांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना पुणे रेल्वे स्थानकासमोर बुधवारी (११ जून) सकाळी सव्वानऊ वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोठारी आणि कोठारी कंपनीच्या मुंबई शाखेतून ६९ लाख ७० हजार ३६८ रुपयांचे सोन्याचे दागिने असलेले आठ पार्सल पुण्यातील शाखेत पोहोचविण्यासाठी अंबे एक्सप्रेस लॉजिस्टिक कंपनीकडे देण्यात आली होती. कंपनीचा कर्मचारी ही पार्सल घेऊन मुंबईहून रेल्वेने पुण्यात आला. पुणे रेल्वे स्थानकाबाहेर आला असता, दोघांनी त्याच्या कंबरेला पिस्तूल लावले. त्याला मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडील आठ पार्सल जबरदस्तीने काढून घेतली. घाबरलेल्या कर्मचाऱ्याने ही बाब व्यवस्थापक प्रथमेश माने यांना कळविली. ते तातडीने पुण्यात आले. त्यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पुणे रेल्वे स्थानकाजवळील सीसीटीव्हीमध्ये या कर्मचाऱ्याच्या शेजारी दोघे जण दिसत आहेत. त्यांनी तोंडाला रुमाल बांधलेला दिसून येत आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी सांगितले.