पुणे : महामेट्रोकडून पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्याच वेळी महामेट्रोने दुसऱ्या टप्प्याची तयारी केली. महामेट्रोने दुसऱ्या टप्प्याचा प्रकल्प विकास आराखडा महापालिकेला आठ महिन्यांपूर्वी सादर केला. अद्याप त्याला महापालिकेने मंजुरी दिलेली नाही. यामुळे महामेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला विलंब होऊन पुढील नियोजन बिघडण्याची भीती महामेट्रोला वाटत आहे.
मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रकल्प विकास आराखडा २६ सप्टेंबर २०२२ रोजी महामेट्रोने पुणे महापालिकेकडे सादर केला. त्यानंतर महापालिकेने त्यामध्ये काही शंका उपस्थित केल्या. त्या संदर्भात महामेट्रो आणि महापालिका यांच्यात अनेक बैठका झाल्या. महापालिकेने प्रकल्प विकास आराखडा मंजूर करून लवकरात लवकर राज्य सरकारकडे पाठवायला हवा होता. त्यानंतर राज्य सरकारने तो केंद्र सरकारकडे पाठवला असता आणि अंतिम मंजुरी मिळाली असती. परंतु, आठ महिने उलटूनही प्रकल्प विकास आराखडा महापालिकेतून पुढे सरकला नाही. केवळ त्याला तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे.




हेही वाचा >>> पुणे : मार्केटयार्डमध्ये मध्यरात्री गोडाउनला आग
महामेट्रोच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. ते संपण्याआधी दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू व्हायला हवे. मेट्रोच्या मंजुरीची पुढील प्रक्रिया वेळखाऊ आणि किचकट असते. या प्रकल्पासाठी केंद्र व राज्य प्रत्येकी २० टक्के निधी देतात. उरलेला ६० टक्के निधी महामेट्रोला जागतिक पातळीवरील वित्तीय संस्थांकडून कर्जाऊ उभारावा लागतो. त्यासाठी परराष्ट्र मंत्रालयापासून नगरविकास मंत्रालयापर्यंत अनेक मंत्रालयांची मंजुरी लागते. महापालिकेनेच आता मंजुरीसाठी आठ महिन्यांहून अधिक काळ लावला आहे. याचबरोबर पहिल्या टप्प्याचे काम सुरू असतानाच दुसरा टप्पा सुरू करणे सोपे ठरते. त्यात खंड पडल्यास पुन्हा पहिल्यापासून कामाच्या सर्व गोष्टींचे नियोजन करावे लागते. त्यामुळे प्रकल्प मंजुरीची प्रक्रिया वेळेत पार न पडल्यास पुढील आर्थिक व इतर गणिते बिघडण्याचा धोका असतो.
हेही वाचा >>> पुणे : ‘द केरला स्टोरी’ चित्रपट दाखविण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग
मेट्रोचा प्रकल्प विकास आराखडा
– पहिल्या टप्प्याचा विस्तार : पिंपरी-चिंचवड ते निगडी, स्वारगेट ते कात्रज मार्ग
– दुसऱ्या टप्प्याची उभारणी : वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली, नळस्टॉप ते माणिकबाग, उच्च क्षमता सार्वजनिक वाहतूक मार्ग
– एकूण खर्च : १६,९५६ कोटी रुपये
– एकूण लांबी : ८८.३६ किलोमीटर
– एकूण स्थानके : ८६
मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रकल्प विकास आराखडा बांधकाम विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. बांधकाम विभागाच्या मंजुरीनंतर तो आयुक्तांकडे मंजुरीसाठी जाईल. त्यानंतर तो राज्य सरकारला पाठवला जाईल.