माळीण गावावर कोसळलेल्या दरडीच्या घटनेला ३० तासांहून अधिक काळ लोटल्यानंतर एनडीआरएफच्या जवानांनी गुरूवारी याच गावातून आई आणि तिच्या तीन महिन्यांच्या बाळाला सुरक्षितरित्या बाहेर काढले. सदर महिलेचे नाव प्रमिला लिंबे असून, मुलाचे नाव रूद्र असे आहे. बुधवारी दरड कोसळल्याने संपूर्ण गाव माती आणि चिखलाखाली सापडले आहे.
प्रमिला लिंबे बुधवारी सकाळी आपल्या लहान मुलाला दूध पाजत असताना दरड कोसळल्याने ते ढिगा-याखाली सापडले. गुरूवारी संध्याकाळी साडेचार वाजता बचाव पथकाला त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. महिलेच्या पाठीला थोडा मुकामार लागला असून, मुलाला थोडं खरचटलं आहे. त्यानंतर त्यांना जवळच्याच चिंचवाडी या गावात एका घरात आश्रय देण्यात आला होता, परंतू त्रास होत असल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना रूग्णवाहिकेतून मंचरला पाठविण्यात आले आहे.
या दुर्घटनेतून ८ जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर आतापर्यंत ३० मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, अजूनही शेकडो लोक ढिगा-याखाली अडकले आहेत. असं असताना ढिगाऱ्याखाली अडकेलेल्या माय-लेकराला मृत्युच्या दाढेतून सुखरुप बाहेर काढण्यात यश आल्याने दु:खद प्रसंगी अनेकांच्या चेह-यावर हास्य झळकताना पहायला आहे.