पुणे : शहर आणि उपनगरांमध्ये गुरुवारी रात्री वादळी पावसाने तडाखा दिला. विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला.
शहर आणि परिसरात जूनच्या पहिल्या आठवड्यात सरासरीपेक्षी कमी पाऊस नोंदवला गेला आहे. मात्र, येत्या काही दिवसांत पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने १४ जूनपर्यंत जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’ दिला आहे. गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाला. मध्यवर्ती पेठांसह डेक्कन, कात्रज, सिंहगड रस्ता, कोथरूड, बावधन, बिबवेवाडी अशा उपनगरांमध्येही मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. तसेच, पावसामुळे रस्ते जलमय होऊन वाहतूक खोळंबली होती. सखल भागांमध्ये पाणी साचल्याचे दिसून आले.