विद्यापीठाच्या कुलपतींची नियुक्ती ट्रस्टने करायची आणि त्याच कुलपतींनी विद्यापीठाच्या अधिकार मंडळातील सदस्यांना मंजुरी द्यायची असे ताटातले वाटीत आणि वाटीतले ताटात करण्याचा प्रकार विद्यापीठात सुरू आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची ट्रस्ट, अधिकार मंडळे, विद्यापीठातील महत्त्वाची पदे या सगळ्यातूनही ‘घराणेशाही’ची झलक दिसून येते.
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ हे खासगी विद्यापीठ नाही, ते पब्लिक ट्रस्टच्या माध्यमातून चालवण्यात येणारे विद्यापीठ आहे. विद्यापीठाच्या विश्वस्त मंडळातील पाच सदस्यांपैकी तीन सदस्य हे ‘टिळक’ घराण्यातील आहेत. या विश्वस्त मंडळाने विद्यापीठाच्या कुलपतींची निवड करायची. विश्वस्त मंडळाने निवडलेल्या कुलपतींनी विद्यापीठाच्या अधिकार मंडळांना आणि मोठय़ा आर्थिक कारभारांना नियुक्ती द्यायची, असे चक्रच या विद्यापीठात सुरू आहे. विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉ. दीपक टिळक, डॉ. गीताली टिळक-मोने, प्रणिती टिळक, डॉ. सुचेता साठे आणि डॉ. म. श्री. दीक्षित हे सध्या विद्यापीठाचे विश्वस्त आहेत. डॉ. दीपक टिळक यांची नियुक्ती ही कुलपतींच्या संमतीने झाली असे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, ज्या कुलपतींनी डॉ. टिळक यांची कुलगुरुपदी नियुक्ती केली, त्या कुलपतींची नियुक्ती ही विद्यापीठाच्या ट्रस्टने केलेली आहे. कुलपतींच्या नियुक्तीसाठी नेमण्यात आलेल्या समितीमध्येही ट्रस्टचेच सदस्य होते. विद्यापीठाने तांत्रिकदृष्टय़ा विश्वस्त मंडळ आणि विद्यापीठाची अधिकारमंडळे स्वतंत्र केली असली, तरी दोन्ही ठिकाणी असलेले सदस्य मात्र सारखेच आहेत.
देशातील अभिमत विद्यापीठांच्या दर्जाचा अभ्यास करण्यासाठी केंद्र शासनाने नेमलेल्या टंडन समितीच्या अहवालामध्ये देशातील ‘क’ दर्जा मिळालेल्या विद्यापीठांच्या दर्जाबद्दल आणि घराणेशाहीबद्दल ताशेरे ओढण्यात आले होते. शिक्षणसंस्था या ‘कौटुंबिक व्यवसाय’ झाल्याची टीकाही करण्यात आली होती. टंडन समितीच्या शिफारसींमध्ये ही घराणेशाही टाळण्यासाठी ‘कुलपती’ हे विश्वस्त मंडळाचे सदस्य नसावेत असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्टय़ा टिमविला या शिफारसीची पळवाट मिळत आहे.
जी कथा विद्यापीठाच्या ट्रस्टची आहे, तीच विद्यापीठाच्या अधिकार मंडळांची आणि महत्त्वाच्या पदांचीही आहे. विद्यापीठातील व्यवस्थापन शास्त्र अभ्यासक्रमाचे विभागप्रमुख पद सध्या रिक्त ठेवण्यात आले आहे. विभागामध्ये अनेक ज्येष्ठ, पात्रताधारक अध्यापक असतानाही हे पद रिक्त ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. प्रत्यक्षात या पदाचे कामकाज सध्या प्रणिती रोहित टिळक या पाहत आहेत. प्रणिती टिळक या गृहव्यवस्थापन शास्त्रातील पदवीधर आहेत आणि इंटरनॅशनल मॅनेजमेंट या विषयातील एक वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम (एमएससी) त्यांनी केला आहे. सध्या विद्यापीठाच्या व्यवस्थापन शास्त्र विभागामध्ये त्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहेत. मात्र, तरीही विभागप्रमुख पदाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली असल्याची कुजबुज विद्यापीठात आहे. व्यवस्थापन विभागाचे अधिष्ठाता म्हणून अभियांत्रिकी विभागातील अध्यापक डॉ. हेमंत अभ्यंकर यांना कार्यभार देण्यात आला आहे. व्यावसायिक अभ्यासक्रम विभागाच्या प्रमुखपदाची जबाबदारी डॉ. गीताली टिळक-मोने यांच्याकडे आहे. त्याचबरोबर त्या विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्याही सदस्य आहेत.
—
‘‘आम्ही विद्यापीठाचे विश्वस्त मंडळ आणि अधिकार मंडळे स्वतंत्र केली आहेत. टंडन समितीच्या अहवालामध्ये ‘कुलपती’ किंवा त्यांचे नातेवाईक हे विश्वस्त मंडळाचे सदस्य असू नयेत असे म्हणण्यात आले आहे. ‘कुलगुरू’ विश्वस्त असू नयेत असा उल्लेख नाही. त्यामुळे आम्ही अडचणीत नाही.’’
– डॉ. दीपक टिळक, कुलगुरू, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ
संग्रहित लेख, दिनांक 9th Mar 2014 रोजी प्रकाशित
विश्वस्त मंडळ, अधिकार मंडळ सर्वत्र ‘टिळक’
ताटातले वाटीत आणि वाटीतले ताटात करण्याचा प्रकार विद्यापीठात सुरू आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची ट्रस्ट, अधिकार मंडळे, विद्यापीठातील महत्त्वाची पदे या सगळ्यातूनही ‘घराणेशाही’ची झलक दिसून येते.

First published on: 09-03-2014 at 03:32 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tilak maharashtra vidyapeeth trust family deemed university