राहुल खळदकर, लोकसत्ता

पुणे : पंधरवडय़ापूर्वी शंभरीपार गेलेल्या टोमॅटोची बाजारात आवक वाढल्याने दरात घट झाली आहे. किरकोळ बाजारात एक किलो टोमॅटोचे दर प्रतवारीनुसार ६० ते ७० रुपये किलो झाल्याने ग्राहकांना किंचित दिलासा मिळाला आहे.

उन्हाळय़ामुळे टोमॅटोच्या लागवडीत घट झाली होती. त्यामुळे गेल्या दीड महिन्यांपासून बाजारात टोमॅटोची आवक कमी होत होती. मागणीच्या तुलनेत आवक कमी झाल्याने घाऊक आणि किरकोळ बाजारात टोमॅटोच्या दरात टप्याटप्याने वाढ होत गेली. किरकोळ बाजारात एक किलो टोमॅटोचे दर १०० ते १२० रुपयांपर्यत गेले होते. दैनंदिन वापरातील कांदा-बटाटय़ाच्या तुलनेत टोमॅटोचे दर शंभरीपार झाल्याने गृहिणींचे अंदाजपत्रक कोलमडले होते. त्यानंतर गेल्या आठवडय़ापासून नवीन लागवड केलेल्या टोमॅटोची आवक बाजारात सुरू झाल्याने दरात घट झाल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील प्रमुख अडते विलास भुजबळ यांनी दिली.

पुणे जिल्ह्यातील खेड, मंचर, नारायणगाव, सातारा जिल्ह्यातील फलटण परिसरात टोमॅटोची लागवड मोठय़ा प्रमाणावर केली जाते. उन्हाळय़ामुळे मध्यंतरी या भागात टोमॅटोची लागवड कमी झाली होती. त्यामुळे तेथून होणारी टोमॅटोची आवक कमी झाली होती. त्यानंतर लागवड केलेल्या नवीन टोमॅटोची आवक सध्या सुरू झाली आहे. टोमॅटोच्या दरात घट होत चालली आहे, असे किरकोळ बाजारातील भाजीपाला व्यापारी प्रकाश ढमढेरे यांनी सांगितले.

मार्केट यार्डातील फळभाजी बाजारात टोमॅटोची आवक वाढली आहे. उन्हाळय़ात टोमॅटोची दैनंदिन आवक घटली होती. गेल्या आठवडाभरापासून बाजारात दररोज सहा ते सात हजार पेटी टोमॅटोची आवक होत असून रविवारी टोमॅटोची आवक दहा ते बारा हजार पेटी एवढी होते.

पावसाने तडाखा न दिल्यास दर स्थिर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या बाजारात  टोमॅटोची आवक सुरू झाली आहे. खेड, मंचर, नारायणगाव तसेच फलटण परिसरातील टोमॅटो पुण्यातील मार्केट यार्डात विक्रीस पाठविण्यात येतो. नाशिक भागातील टोमॅटोची आवक मुंबई, ठाण्यातील बाजारात होते. काढणीस आलेल्या टोमॅटोला पावसाचा तडाखा न बसल्यास बाजारात टोमॅटोची आवक सुरळीत राहील. पावसाळय़ात टोमॅटो खराब होण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या टोमॅटोला चांगला भाव मिळतो, असे घाऊक फळभाजी बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितले.