पुणे : राज्यात झिकाची रुग्णसंख्या १४० वर पोहोचली आहे. त्यात सर्वाधिक १०९ रुग्ण पुण्यात आहेत. राज्यातील एकूण रुग्णांपैकी जवळपास निम्म्या गर्भवती आहेत. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. याचबरोबर तापरुग्णांच्या सर्वेक्षणावर भर दिला जात आहे.

राज्यात या वर्षात २८ नोव्हेंबरपर्यंत १४० रुग्ण आढळले असून त्यातील ६३ गर्भवती आहेत. राज्यात पुण्यात यंदा सर्वप्रथम झिकाचा रुग्ण आढळून आला. आतापर्यंत पुणे महापालिकेच्या हद्दीत झिकाचे १०९ रुग्ण आढळून आले आहेत. त्याखालोखाल अहिल्यानगर (संगमनेर) ११ रुग्ण, पुणे ग्रामीण १० रुग्ण, पिंपरी-चिंचवड महापालिका ६ रुग्ण आणि सांगली, मिरज, कोल्हापूर, सोलापूर, दादर (उत्तर) मुंबईत प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे. दरम्यान, पुण्यात झिकाच्या पाच रुग्णांचा मृत्यू झाला होता. हे सर्व रुग्ण ज्येष्ठ नागरिक होते आणि त्यांचा मृत्यू सहव्याधींमुळे झाल्याचे आरोग्य विभागाच्या मृत्यू परीक्षण समितीने स्पष्ट केले आहे.

आणखी वाचा-पुणे: पतीने केली प्रेयसीची हत्या; पत्नीने आणि मेहुण्याने मृतदेहाची लावली विल्हेवाट

राज्यात २ हजार ६८ संशयित झिका रुग्णांचे रक्तनमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणूविज्ञान प्रयोगशाळेत (एनआयव्ही) पाठविण्यात आले. त्यातील १४० जणांचे झिकाचे निदान झाले. झिका रुग्ण आढळून आलेल्या परिसरात ३ ते ५ किलोमीटर परिसरात तापरुग्णांचे सर्वेक्षण आरोग्य विभागाकडून सुरू आहे. याचबरोबर झिकाचा प्रसार एडीस इजिप्ती डासांमुळे होत असल्याने कीटकनाशक फवारणीसह इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

आरोग्य विभागाच्या उपाययोजना

  • झिकाचा रुग्ण आढळून आल्यास परिसरात तापरुग्णांचे सर्वेक्षण
  • गर्भवती महिलांची प्राधान्याने तपासणी
  • सर्व तापरुग्णांवर लक्षणाच्या आधारे उपचार
  • गर्भवती महिलांना झिकाच्या धोक्याबाबत मार्गदर्शन
  • डास प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर
  • संशयित रुग्णांची माहिती कळविण्याची खासगी डॉक्टरांना सूचना

आणखी वाचा-G D Madgulkar Award : आशा काळे यांना गदिमा पुरस्कार जाहीर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

झिकाच्या रुग्णांना रुग्णालयात दाखल व्हावे लागत नाही. या रोगामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही नगण्य आहे. नागरिकांना ताप आल्यास घाबरून न जाता डॉक्टरांना दाखवून वेळीच उपचार घ्यावेत. -डॉ. बबिता कमलापूरकर, सहसंचालक, आरोग्य