पुणे: पाकिस्तानबरोबर युद्धजन्य परिस्थितीत तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिल्याने तुर्कीतील सफरचंदांवर पुण्यातील मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी बहिष्कार घातला आहे. तुर्कीतून सफरचंदे खरेदी करायची नाहीत, असा निर्णय व्यापाऱ्यांनी केला आहे. सध्या काश्मीरमधील सफरचंदांची आवक ठप्प असून, बाजारपेठांमध्ये इराणमधील सफरचंदे उपलब्ध आहेत. पुण्यातील फळबाजारात इराण, वाॅशिंग्टन, न्यूझीलंड, तसेच तुर्कीतून सफरचंदे विक्रीस पाठविली जातात. शीतगृहात साठवणूक करण्यात आलेली ही सफरचंदे वर्षभर उपलब्ध असतात. परदेशी सफरचंद आकर्षक आणि चकचकीत दिसतात. मात्र, पोषणमूल्य विचारात घेता काश्मीर, हिमाचल प्रदेशातील सफरचंदांंचे सेवन आरोग्याच्या दृष्टीने हितकारक मानले जाते. बागेतून तोडून ही सफरचंदे देशभरात विक्रीस पाठविली जातात, अशी माहिती मार्केट यार्डातील श्री गुरुदेव दत्त फ्रूट एजन्सीचे संचालक, सफरचंद व्यापारी सत्यजित सुयोग झेंडे यांनी दिली.

इराणमधील सफरचंदांचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर तुर्कीतील सफरचंदांचा हंगाम सुरू होतो. तुर्कीतील सफरचंदाची आयात बंद झाली आहे, असे झेंडे यांनी स्पष्ट केले.काश्मीरमधील सफरचंद पुणे, मुंबईतील बाजारपेठेत पाठविण्यात येते.

व्यापारी काश्मीरमधील शेतकऱ्यांकडून थेट खरेदी करतात. मध्यंतरी काश्मीरमध्ये झालेल्या पावसामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला. गेल्या पाच ते सहा दिवसांतील तणावाच्या वातावरणाच्या पार्श्वभूमवीर काश्मीरमधील सफरचंदाची आवक कमी प्रमाणावर होत आहे.

काश्मीरमध्ये तोड केलेल्या सफरचंदाच्या साठवणुकीसाठी नियंत्रित वातावरण असलेले कक्ष (कंट्रोल्ड ॲटमाॅस्फीअर चेंबर) उपलब्ध करून दिले आहेत. या कक्षात सफरचंदाची साठवणूक काश्मीरमधील शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे हंगाम संपल्यानंतरही ती वर्षभर उपलब्ध असतात, असे झेंडे यांनी नमूद केले.