दुकाने उघडी ठेवण्याबाबत व्यापारी ठाम

पालकमंत्र्यांच्या बैठकीतील निर्णयाची प्रतीक्षा

पालकमंत्र्यांच्या बैठकीतील निर्णयाची प्रतीक्षा

पुणे : करोना र्निबधांनुसार दुपारी चार वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्याचे आदेश असले तरीही शहरातील व्यापारी सायंकाळपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यासंदर्भात ठाम आहेत. त्यामुळे दुपारी चारनंतर दुकाने उघडी ठेवून व्यापाऱ्यांनी एकजूट दाखवून दिली. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीतील बैठकीत निर्णय होण्याची प्रतीक्षा असून सोमवापर्यंत (९ ऑगस्ट) दुकाने चारनंतर उघडी ठेवण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे.

पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, सचिव महेंद्र पितळिया यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने महापौर मुरलीधर मोहोळ, महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेतली. त्यावेळी पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये शनिवारी (७ ऑगस्ट) होणाऱ्या बैठकीत व्यापाऱ्यांची मागणी ठेवण्यात येईल, असे महापौर आणि पोलिस आयुक्तांनी सांगितले.

राज्यातील २२ जिल्ह्य़ांमधील र्निबध शिथिल करण्यात आले असून तेथे दुकानांची वेळ वाढवून देण्यात आली आहे. मात्र, करोनाबाधितांची संख्या कमी असतानाही प्रशासनाने पुण्यातील दुकानांना वेळ वाढवून न दिल्याने व्यापाऱ्यांनी बुधवारपासून शहरातील सर्व दुकाने सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार सलग दुसऱ्या दिवशी व्यापाऱ्यांनी दुपारी चारनंतर दुकाने उघडी ठेवली होती.

करोना र्निबधांनुसार दुकाने चार वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याचे आदेश प्रसृत करण्यात आले आहेत. पुणेकरांना र्निबधांतून दोन दिवसांत दिलासा मिळेल, असे आश्वासन पालकमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले होते. पण, प्रत्यक्षात पुण्यातील र्निबध कायम ठेवण्यात आल्यामुळे व्यापाऱ्यांची सहनशीलता संपली. पुणेकरांची स्वाक्षरी मोहीम, दुकानांसमोर घंटानाद आंदोलन करून व्यापाऱ्यांनी शासनाचे लक्ष वेधले. ‘खटले भरले तरी चालेल, पण बुधवारपासून चारनंतर दुकाने उघडी ठेवू’ असा आक्रमक पवित्रा व्यापाऱ्यांनी घेतला. त्यानुसार बुधवारी लक्ष्मी रस्त्यावरील व्यापाऱ्यांकडून दुकाने उघडी ठेवण्यात आली होती. व्यापारी महासंघाच्या आवाहनानुसार गुरुवारी दुपारी चारनंतर शहराच्या विविध भागात व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू ठेवली. मात्र, पोलिसांचे पथक, अधिकारी फिरत असल्याने तासाभरात दुकाने बंद करण्यात आली.

पालकमंत्री अजित पवार यांच्याबरोबर शनिवारी होणाऱ्या बैठकीत चर्चेचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करून सोमवारनंतर  परिस्थितीनुसार पुन्हा सायंकाळी सात वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यात येतील, असे महेंद्र पितळिया यांनी सांगितले.

पोलिसांशी हुज्जत नको

दुपारी चारनंतर उघडय़ा असलेल्या दुकानांची छायाचित्रे टिपली जात असताना पोलिसांशी हुज्जत घालू नये, असे आवाहन फत्तेचंद रांका यांनी व्यापाऱ्यांना केले. ‘पोलीस, महापालिका अधिकारी हे त्यांचे काम करीत आहेत. त्यांच्याशी वाद घालू नका. तसेच पोलिसांच्या कामात अडथळा आणू नका. शांतपणे दुकाने उघडी ठेवा. शॉप अ‍ॅक्ट परवाना देऊ  नका’, अशा सूचना रांका यांनी केल्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Traders in pune insist on keeping shops open zws

ताज्या बातम्या