लोकसत्ता प्रतिनिधी पुणे : प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त मंगळवारी (१९ सप्टेंबर) मध्यभागात वाहतूक बदल करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवाचा प्रारंभ मंगळवारी होणार आहे. प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त मंडळांकडून मिरवणुका काढण्यात येतात. छत्रपती शिवाजी रस्त्यावरील शनिवारवाडा परिसरात ‘श्रीं’ची मूर्ती खरेदीसाठी भाविकांची गर्दी होत असल्याने डेंगळे पूल ते शिवाजी पूल, कसबा पेठ, जिजामाता चौक, सारसबाग परिसरातील सावरकर पुतळा चौक ते समाधान भेळ सेंटर (सिंहगड रस्ता) परिसरात वाहतूक बदल करण्यात येणार आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली. आणखी वाचा-बालिकेशी अश्लील कृत्य करणारा अटकेत; कोथरुड परिसरात घटना छत्रपती शिवाजी रस्त्यावरील गाडगीळ पुतळा चौक ते गोटीराम भैय्या चौक (मंडई) परिसरात वाहतुकीस बंद राहणार आहे. वाहनचालकांनी गाडगीळ पुतळा चौकातून डावीकडे वळून कुंभारवेस चौक, शाहीर अमर शेख चौकमार्गे इच्छितस्थळी जावे. संचेती चौकाकडून छत्रपती शिवाजी रस्त्याने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौकातून (मॉडर्न कॅफे चौक), जंगली महाराज रस्ता, खंडुजीबाबा चौक, टिळक रस्त्याने इच्छितस्थळी जावे. सावरकर पुतळा चौक ते समाधान भेळ सेंटर (सिंहगड रस्ता) परिसरात मूर्ती विक्रेत्यांनी तात्पुरती दुकाने थाटली आहेत. या भागात वाहनचालकांनी वाहने लावू नयेत. मुंढव्यातील केशवनगर भागात मूर्ती खरेदीसाठी होणारी गर्दी विचारात घेऊन या भागात वाहतूक बदल करण्यात आले आहेत. आणखी वाचा-पुणे- मुंबई मार्गावरील बोरघाट धुक्यात हरवला; वाहतूक कोंडीमुळे नव्हे तर धुक्यामुळे द्रुतगतीमार्ग मंदावला! मध्यभागातील वाहतुकीस खुले रस्ते फडके हौद चौक ते जिजामाता चौक ते फुटका बुरूज चौकअप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक ते मोती चौकसोन्यामारुती चौक ते बेलबाग चौक ते सेवासदन चौकमंगला चित्रपटगृहसमोरील प्रिमिअर गॅरेज गल्ली ते खुडे चौक (डेंगळे पूल) वाहने लावण्यासाठी व्यवस्था कामगार पुतळा चौक ते छत्रपती शिवाजी पुतळा चौक दरम्यान एका बाजुला वाहने लावण्यास परवानगी देण्यात आली आहे. महापालिका वीजभरणा केंद्र ते गाडगीळ पुतळा चाैक दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजुला वाहने लावण्यास परवानगी देण्यात आली आहे. टिळक पूल ते भिडे पूल दरम्यान नदीपात्रातील रस्त्यावर वाहने लावण्यास परवानगी देण्यात आली आहे. मंडईतील सतीश मिसाळ वाहनतळ, हुतात्मा बाबू गेनू वाहनतळ येथे वाहने लावता येतील. शाहू चौक (फडगेट पोलीस चौकी) ते राष्ट्रभूषण चौक दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने लावण्याची मुभा देण्यात आली आहे. आणखी वाचा-पुणे: एटीएममध्ये स्फोट घडवून रोकड चोरण्याचा प्रयत्न करणारी टोळी गजाआड पीएमपी मार्गात बदल छत्रपती शिवाजी रस्त्यावरुन स्वारगेटकडे जाणाऱ्य पीएमपी बसच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. स. गो. बर्वे चौक, जंगली महाराज रस्ता, टिळक रस्तामार्गे बस जातील. महापालिकेकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बस जंगली महाराज रस्त्याने जातील.