पुणे : लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाकडून नौदल आणि वायुदलाचा सहभाग असलेला ‘त्रिशूल’ हे संयुक्त सराव आयोजित करण्यात येणार आहे. त्यात खाडी, वाळवंटी भागात आक्रमक हालचालींसह सौराष्ट्र किनाऱ्याजवळ मोहिमा राबवल्या जाणार असून, या सरावात गुप्तचर, देखरेख आणि गुप्त पाहणी आणि सायबर क्षमतांचा समावेश असलेल्या बहुआयामी संयुक्त सरावांचाही समावेश असेल.
दक्षिण मुख्यालयाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या भविष्यातील संरक्षण सिद्धतेसाठी ‘जय’ (संयुक्तता, आत्मनिर्भरता, नवोपक्रम) हा मार्गदर्शक मंत्र दिला आहे. त्यानुसार सशस्त्र दलांनी संयुक्तता अधिक दृढ करणे, आत्मनिर्भरतेला प्रोत्साहन देणे, लष्करी नियोजन व अंमलबजावणीच्या सर्व स्तरांवर नवोपक्रमांमध्ये वाढ करणे आवश्यक आहे.
दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नेतृत्वाखालील दक्षिण मुख्यालयाने या दृष्टीने संयुक्ततेची अंमलबजावणी प्रत्यक्षात आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. संयुक्तता हीच कार्यसंस्कृतीचा भाग मानून दक्षिण मुख्यालयाने नेहमीच तिन्ही दलांमध्ये सुसंवाद राखण्यावर भर दिला आहे. तसेच, आत्मनिर्भरता आणि नवोपक्रमावर आधारित परिवर्तनासाठी सातत्याने कटिबद्धता प्रदर्शित केली आहे, असे नमूद करण्यात आले आहे.
आगामी ‘त्रिशूल’ या सरावामध्ये दक्षिण मुख्यालयाचे जवान विविध आणि आव्हानात्मक भूभागांवर संयुक्त कारवायांची अंमलबजावणी तपासण्यासाठी सक्रियपणे सहभागी होतील. या सरावाद्वारे देशी बनावटीच्या प्रणालींचा प्रभावी वापर, कार्यप्रणालींमध्ये आत्मनिर्भरतेचा अवलंब, तसेच बदलत्या युद्धपद्धतींनुसार रणनीती, तंत्र आणि पद्धतींचा समावेश अधोरेखित करण्यात येईल. देशात सण साजरे केले जात असताना दक्षिण मुख्यालयाचे जवान सातत्याने प्रशिक्षण घेऊन त्रिशूल या सरावासाठी सज्ज होत आहेत, असे स्पष्ट करण्यात आले.