पुणे : गावठी दारू विक्री प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली. हडपसर भागातील महंमदवाडी, सय्यदनगर परिसरात ही कारवाई करण्यात आली. सुलतान सादिक बागवान (वय ३३, रा. सय्यदनगर, हडपसर), कुंदन निकलेश गौतम (वय २८, रा. कृष्णानगर, महंमदवाडी, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. काळेपडळ पोलिसांचे पथक सय्यदनगर भागात गस्त घालत होते. त्या वेळी बागवान हा गावठी दारूची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून साडेसात हजार रुपयांची गावठी दारू जप्त करण्यात आली.
कुंदन गौतम हा महंमदवाडी भागात गावठी दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पाच हजार रुपयांची गावठी दारू जप्त करण्यात आली. दोघांविरुद्ध पोलिसांनी मुंबई दारूबंदी अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, वेगवेगळ्या कारवाईत पोलिसांनी १२ हजार ५१० रुपयांची गावठी दारू जप्त केली. पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील आणि पथकाने ही कारवाई केली.