हिंदुराष्ट्र सेनेशी संबंधित तुषार हंबीर याच्यावर ससून रुग्णालयात हल्ला करणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे शाखेने एनडीए रस्ता परिसरातून अटक केली.
प्रकाश उर्फ वैष्णव रणछोडदास दिवाकर (वय २२, रा. भीमनगर, उत्तमनगर, एनडीए रस्ता), परवेज उर्फ साहिल हैदरअली इनामदार (वय २१, रा. आदर्शनगर, ऊरळी देवाची, सासवड रस्ता) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यापूर्वी सागर ओव्हाळ, बालाजी ओव्हाळ, प्रतिक कांबळे, ऋतिक राजू गायकवाड या चौघांना अटक करण्यात आली आहे. हंबीर याच्या विरोधात खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली आहे. कारागृहात हंबीर याला स्नायू दुखीचा त्रास होत असल्याने त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

हेही वाचा >>> पुणे : भेंडी, गवार महाग ; पितृपंधरवड्यामुळे फळभाज्यांना मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिवाकर आणि इमानदारसह सागर ओव्हाळ, बालाजी ओव्हाळ, प्रतिक कांबळे, ऋतिक राजू गायकवाड यांनी ससून रुग्णालयात जाऊन हंबीरवर पिस्तुलातून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर शस्त्राने वार केले. त्या वेळी बंदोबस्तात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने प्रसंगावधान राखून आरोपींना रोखले. आरोपींनी हंबीरच्या मेहुण्यावर शस्त्राने वार केले. पसार झालेले आरोपी दिवाकर आणि इनामदार हे उत्तमनगर परिसरात थांबल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर सापळा लावून पोलिसांनी दोघांना पकडले.अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक निरीक्षक कृष्णा बाबर, प्रताप गायकवाड, प्रमोद टिळेकर, विनोद शिवले, अकबर शेख, दया शेगर आदींनी ही कारवाई केली.