पुणे : गंभीर यकृतविकाराच्या दोन रुग्णांना तातडीने यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता होती. यासाठी या दोन्ही रुग्णांच्या पत्नी दाता म्हणून पुढे आल्या. मात्र, त्यांचे रक्तगट जुळत नसल्याने प्रत्यारोपण करणे शक्य नव्हते. अशा वेळी रुग्णालयाने पुढाकार घेऊन दात्यांची अदलाबदल करून या प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केल्या. यामुळे दोन्ही रुग्णांना जीवदान मिळाले आहे.
नांदेडमधील ४१ वर्षीय रुग्ण आणि चिपळूणचे ५३ वर्षीय रुग्ण हे यकृतविकाराने त्रस्त होते. त्यांचे यकृत निकामी झाले असल्याने प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय शिल्लक होता. यकृताचा काही भाग दान म्हणून देण्यासाठी दोन्ही रुग्णांच्या पत्नींनी तयारी दर्शविली. मात्र, रुग्ण आणि त्यांच्या पत्नी यांचे रक्तगट भिन्न असल्याचे समोर आले. त्यामुळे हे प्रत्यारोपण शक्य नव्हते. एकाच वेळी दोन रुग्णांना यकृत प्रत्यारोपणाची गरज आणि दाता असलेल्या त्यांच्या पत्नी होत्या.
या रुग्णांचे रक्तगट हे एकमेकांच्या पत्नीच्या रक्तगटाशी जुळत होते. त्यामुळे डॉक्टरांनी दोन्ही रुग्णांच्या कुटुंबीयांचे समुपदेशन केले. एकमेकांना यकृतदान करून दोन्ही कुटुंबे त्यांच्या रुग्णाचा जीव वाचवू शकतात, असे डॉक्टरांनी त्यांना सांगितले. यावर दोन्ही रुग्णांच्या नातेवाइकांनी होकार दर्शविला. डॉक्टरांनी एकाच वेळी चार शस्त्रक्रिया कक्षांमध्ये या यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्या. या शस्त्रक्रियांसाठी सुमारे दहा ते बारा तासांचा कालावधी लागला. दोन्ही रुग्णांची प्रकृती सुधारत असून, त्यांच्या पत्नींनाही एका आठवड्यात रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
याबाबत खारघरमधील मेडिकव्हर हॉस्पिटलमधील यकृत प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. शरण नारुटे म्हणाले की, एकाच कुटुंबातील रुग्ण आणि दात्याचा रक्तगट जुळत नसल्याने या रुग्णांसाठी ‘स्वॅप लिव्हर ट्रान्सप्लांट’ म्हणजेच दात्यांची अदलाबदल हा एकमेव पर्याय शक्य होता. अशा शस्त्रक्रियेत दोन कुटुंबांमधील दात्यांची अदलाबदल करून दोन्ही रुग्णांचे प्राण वाचवता येतात. दोन्ही रुग्णांच्या पत्नींनी दाखवलेले धैर्य आणि आमच्या वैद्यकीय पथकाचे कौशल्य यामुळे या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या.
दोन यकृत प्रतिहारी शिरांमुळे गुंतागुंत
यकृतदान करणाऱ्या दोन्ही दात्यांमध्ये दोन यकृत प्रतिहारी शिरा होत्या. ही यकृतातील मोठी शीर पोट, आतडे, प्लीहा आणि स्वादुपिंड यांसारख्या अवयवांतून रक्त गोळा करून यकृतापर्यंत पोहोचवते. त्यामुळे दात्यांच्या यकृताचा काही भाग काढून घेताना या शिरांचे व्यवस्थापन करण्याचे आव्हान डॉक्टरांसमोर होते. डॉक्टरांनी ही गुंतागुंत कमी करून शस्त्रक्रिया यशस्वी केल्या.