पिंपरी : पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी प्रयत्नशील असलेल्या चिंचवडमधील श्री शंकर महाराज सेवा मंडळाने यंदाही ‘मूर्ती आमची, किंमत तुमची’ हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. मूर्ती साकारण्यासाठी किती खर्च झाला, याची माहिती दिलेली असते. गणेशभक्तांनी कोणतीही मूर्ती घ्यावी आणि त्यांना वाटेल ती रक्कम दानपेटीत द्यावी, अशी संकल्पना या उपक्रमामागे आहे. त्यातून जमा झालेली रक्कम ही ‘स्नेहसावली- आपलं घर’ या वृद्धाश्रमासाठी वापरली जाणार असल्याने नागरिकांचा या उपक्रमाला प्रतिसाद मिळत आहे.

चिंचवडगाव, चापेकर चौक येथील चिंचवडे लॉन्समध्ये ‘मूर्ती आमची, किंमत तुमची’ हे पर्यावरणस्नेही गणेश मूर्तींचे दालन २४ ऑगस्टपासून सुरू झाले आहे. ते सात सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत दालन सुरू असते. या उपक्रमात वेगवेगळ्या आकारातील आणि वेगवेगळ्या ५९ प्रकारच्या तीन हजार पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. या मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. सहा इंचापासून दोन फुटापर्यंतच्या मूर्ती आहेत. या मूर्ती तयार करण्यासाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिस किंवा कोणताही रासायनिक रंग वापरण्यात आलेला नाही. केवळ हळद, कुंकू, गुलाल, बुक्का, गेरू आणि शाडू मातीचा वापर करून या मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. गेली दहा वर्षे शंकर महाराज सेवा मंडळ हा उपक्रम राबवत आहे. यंदाचे ११ वे वर्षे आहे. भाविक या दालनास भेट देऊन त्यांच्या पसंतीची श्री गणेशमूर्ती निवडतात आणि या संस्थेच्या विविध उपक्रमांना आर्थिक मदत म्हणून दानपेटीत त्यांना वाटेत ती रक्कम टाकतात. यातून जमा झालेली रक्कम सत्कारणीच लागेल अशी समाजाची खात्री असल्यामुळेच या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. अविनाश वैद्य यांनी सांगितले.

हेही वाचा…राजकोट पुतळा घटनेच्या निषेधार्थ पुण्यात अजित पवार गटाकडून मूक आंदोलन

या उपक्रमाबाबत डॉ. मनाली वैद्य म्हणाल्या की, या उपक्रमातून मिळालेली रक्कम वृद्धाश्रम चालविण्यासाठी वापरली जाते. संस्थेमार्फत पर्यावरणाच्या रक्षणासाठी कापडी पिशव्या तयार केल्या जातात. आतापर्यंत १८०० हून अधिक रक्तदान शिबिरे घेण्यात आली आहेत. अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी संस्थेने मदत केली आहे.

चऱ्होलीत ‘स्नेहसावली- आपलं घर’ वृद्धाश्रम

संस्थेचे ‘स्नेहसावली- आपलं घर’ हे वृद्धाश्रम चऱ्होलीत आहे. या ठिकाणी समाजातील निराधार ज्येष्ठांचा मोफत सांभाळ केला जातो. त्यासाठी वर्षाला ३० ते ३५ लाख रुपये खर्च होतो. या उपक्रमासाठी लागणाऱ्या निधीसाठी संस्थेतर्फे अभिनव योजना राबवल्या जातात. संस्थेचे स्वयंसेवक रद्दी, घरोघर तयार होणारे भंगार गोळा करतात. त्यांचा शक्य असल्यास पुनर्वापर केला जातो. अथवा ते विकून निधी उभारला जातो. अशा या आगळ्या वेगळ्या संस्थेसाठी लोक गणेशमूर्ती उपक्रमातून मदत करत असतात.

हेही वाचा…कल्याणीनगर अपघात प्रकरण : मुलाविरुद्ध सज्ञान समजून खटला चालविण्याची पोलिसांची मागणी

मूर्ती निर्मितीसाठी आलेला खर्च माहितीसाठी लिहिला आहे. परंतु, मूर्तीसाठी कोणतेही शुल्क बंधनकारक नाही. नागरिक पसंतीची गणेशमूर्ती निवडतात आणि दानमंदिरात गुप्तदान टाकतात. या उपक्रमासाठी एक हजार जणांचे हात झटत आहेत. उपक्रमातून आलेली रक्कम वृद्धाश्रमासाठी वापरली जाते. वृद्धाश्रमाची इमारत बांधण्यासाठी सर्वांनी मदत करावी, असे आवाहन डॉ. मनाली वैद्य यांनी केले.

हेही वाचा…एसटीची डिझेलवरील वाहने ‘एलएनजी’मध्ये रूपांतरित करण्याचा घाट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मूर्ती पाहण्यास आलो होतो. परंतु, वैद्य दाम्पत्य आणि आशा पाथरूडकर यांचे सेवाकार्य पाहून मी यांच्याशी जोडलो गेलो. स्वयंसेवक बनून या सेवाकार्यात खारीचा वाटा उचलत असल्याचे स्वयंसेवक प्रशांत कुलकर्णी यांनी सांगितले.