लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : ऐन दिवाळी सणाच्या पूर्वसंध्येला कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील काही भागाला पावसाने झोडपून काढले. सोलापूरसह सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत हलका पाऊस पडला. अवकाळी पावसामुळे शेतकरी, व्यापारी आणि दिवाळी खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या ग्राहकांना त्रास सहन करावा लागला.

सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागाला अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. बुधवारी पहाटेपासून दिवसभर अधूनमधून पाऊस पडत होता. वारे आणि जोरदार पावसामुळे द्राक्ष वेलीवरील कोवळ्या फुटी मोडून पडल्या आहेत. त्यामुळे दावणी, भुरी या बुरशीजन्य रोगांना प्रादुर्भाव वाढून पिकांचे मोठे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे. रब्बी हंगामातील ज्वारीसह गहू, हरभरा, करडई या रब्बी पिकाला हा पाऊस फायदेशीर ठरणार आहे.

आणखी वाचा-पुण्यातील माजी नगरसेविकेवर बलात्कार प्रकरण : आरोपीची जामिनावर सुटका

कोल्हापुरात बुधवारी पहाटेपासून पाऊस सुरू झाला. ढगांचा गडगडाट, विजेचा कडकडाटात आलेल्या मुसळधार पावसाने अवघा जिल्हा जलमय झाला आहे. मळणीला आलेल्या भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या ऊस पिकाला मोठा आधार मिळाला आहे. रब्बी पिकासाठी पोषक वातावरण झाले आहे. सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने दैना उडविली. बुधवारी पहाटे अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. दिवसभर कमी-अधिक प्रमाणात पाऊस कोसळतच राहिल्याने दिवाळीच्या तोंडावर बाजारपेठेतील खरेदी-विक्री विस्कळीत झाली होती. अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याने महामार्गासह अन्य रस्त्यांवर वाहतूक रोडावली होती. खरीप हंगामातील काढणी होत असलेल्या पिकाला मोठा फटका बसला.

सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील बहुतांश भागात बुधवारी पहाटे मध्यम व हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. पावसामुळे रब्बी ज्वारीसह इतर पिकांच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, द्राक्ष बागांसाठी हा पाऊस आणि ढगाळ हवामान हानिकारक ठरणार आहे. नगरच्या काही भागात बुधवारी सायंकाळी रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाला. जिल्ह्यात सध्या ढगाळ हवामान निर्माण झाले असून, पावसाची चिन्हे अनेक भागात दिसत आहेत.

आणखी वाचा-पिंपरी : प्रदूषण करणाऱ्यांवर आता कारवाई, महापालिकेची विशेष पथके तैनात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात कापणीयोग्य भात पिकाचे पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. रत्नागिरीसह राजापूर, लांजा आणि संगमेश्वर या चार तालुक्यांत चांगला पाऊस झाला. कापलेला भात पावसात भिजला आहे. दिवसभर ढगाळ वातावरणामुळे तो सुकवणेही शक्य झाले नाही. त्यामुळे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली. मेघगर्जना आणि विजांच्या गडगडाटासह आलेल्या पावसामुळे भातशेती पाण्याखाली गेली आहे. उभ्या व कापलेल्या भाताला कोंब आले असून, भाताचा पेंडाही कुजण्याची भीती आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवारी रात्री पावणेदहाला सुरू झालेला पाऊस बुधवारी सकाळी १० वाजेपर्यंत सुरू होता.