पुणे : आगामी महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचना तयार करण्याचा कार्यक्रम नगर विकास विभागाने जाहीर केला आहे. प्रभाग रचनेचे वेळापत्रक गुरुवारी जाहीर करण्यात आले असून, अंतिम प्रभाग रचना चार सप्टेंबरपर्यंत जाहीर होणार आहे. त्यानंतर आरक्षण, आचारसंहिता या सर्व गोष्टी लक्षात घेता पुणे तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीचे ‘फटाके’ दिवाळीनंतरच फुटण्याची शक्यता आहे.

दिवाळीपूर्वी शाळांच्या सहामाही परीक्षा असतात. निवडणुकीसाठी मतदान केंद्रे तयार करण्यासाठी शाळा तसेच कामासाठी आवश्यक असलेला शिक्षक वर्ग उपलब्ध होणे अवघड आहे. त्यामुळे महापालिकेची निवडणूक दिवाळीनंतरच्या पहिल्या आठवड्यात ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस अथवा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकते.

गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. महापालिकांमध्ये लोकप्रतिनिधींऐवजी सध्या प्रशासक राज असून, प्रशासनाच्या माध्यमातून कारभार चालविला जात आहे. गेल्या महिन्यात निवडणूक घेण्याबाबत दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने चार आठवड्यांत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याबरोबरच चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका घ्याव्यात, असे सांगितले आहे. त्यानंतर चार दिवसांपूर्वी राज्य सरकारने प्रभाग रचना करण्याचे जाहीर केले होते. ही प्रभाग रचना कशा पद्धतीने करायची, याचे सविस्तर वेळापत्रक नगर विकास विभागाने महापालिका आयुक्तांना पाठवले आहे.

यामध्ये ११ ते १६ जून दरम्यान प्रगणक गटाची मांडणी करणे, प्रारूप प्रभाग रचना तयार करणे, १७ आणि १८ जून जनगणनेची प्राप्त माहिती तपासणी करणे, १९ ते २३ जून स्थळ पाहणी करणे, २४ ते ३० जून या काळात गुगल मॅपवर प्रभागाचे नकाशे तयार करणे, एक ते तीन जुलै नकाशावर निश्चित केलेल्या प्रभागातील जागेवर जाऊन तपासणे. चार ते सात जुलै प्रारूप प्रभाग रचनेच्या मसुद्यावर समितीने स्वाक्षऱ्या करणे, आठ ते दहा जुलै दरम्यान प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगास पाठविणे, नंतर त्यास राज्य निवडणूक आयोग अथवा आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याकडून प्रारूप प्रभाग रचनेला मान्यता दिली जाणार आहे.

महापालिकेने तयार केलेल्या प्रारूप प्रभाग रचना २२ ते ३१ जुलैदरम्यान प्रसिद्ध केल्या जाणार आहे. त्यावर हरकती व सूचना मागविणे, एक ते ११ ऑगस्ट या काळात शासनाने नियुक्त केलेल्या प्राधिकृत अधिकाऱ्याने प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी घेणे, १२ ते १८ ऑगस्टदरम्यान सुनावणीनंतर हरकती व सूचनांवरील शिफारसी विचारात घेऊन प्राधिकृत अधिकाऱ्यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना निवडणूक आयोगास पाठविणे. प्राधिकृत अधिकाऱ्यांनी अंतिम केलेल्या प्रभाग रचनेच्या शिफारशींवर निवडणूक आयुक्त यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना संबंधित महापालिका आयुक्तांना कळविणे. २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर राज्य निवडणूक आयुक्त यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध केली जाणार आहे.

राज्य सरकारने तयार केलेल्या वेळापत्रकानुसार ४ सप्टेंबरपर्यंत प्रभागांची रचना जाहीर होणार आहे. ही अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर निवडणुकीसाठी आरक्षण सोडत होईल. त्यानंतर कधीही महापालिकांच्या निवडणुका होऊ शकतात. शालेय विद्यार्थ्यांच्या सहामाही परीक्षा या शक्यतो दिवाळीपूर्वी असतात. त्यामुळे निवडणूक घ्यायची झाल्यास मतदान केंद्र, मतदान अधिकारी म्हणून शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना ड्युटी लावणे अडचणीचे होणार आहे. त्यामुळे महापालिकांच्या निवडणुका या दिवाळीनंतर म्हणजेच ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

११ ते १६ जून प्रगणक गटाची मांडणी करणे

१६ ते १८ जून प्रगणक माहिती तपासणे

२२ ते ३१ जुलै प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे

१ ते ११ ऑगस्ट हरकती, सूचनांवर सुनावणी घेणे

१२ ते १८ ऑगस्ट प्रभाग रचना आयोगाला पाठविणे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर अंतिम प्रभाग रचना जाहीर करणे