पुणे/पिंपरी : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाच्या तपासात आणखी एक धक्कादायक माहिती मिळाली आहे. आत्महत्या केल्याच्या दिवशी वैष्णवीला सासरकडील लोकांकडून मारहाण झाल्याची माहिती शवविच्छेदन अहवालातून मिळाली आहे. शवविच्छेदन अहवालात वैष्णवीच्या शरीरावर २९ जखमा आढळल्या आहेत. त्यापैकी १५ जखमा आत्महत्या करण्यापूर्वी चोवीस तासांच्या आतील आहेत, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली आहे. या प्रकरणात पती, सासू आणि नणंदेच्या पोलीस कोठडीत २८ मे पर्यंत वाढ करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. पी. खंदारे यांनी सोमवारी दिले.

दरम्यान, पसार असताना वैष्णवीचा सासरा राजेंद्र आणि दीर सुशील हगवणे यांना आश्रय दिल्याप्रकरणी कर्नाटकमधील काँग्रेसचे आमदार वीरकुमार पाटील यांचे पुत्र प्रीतम वीरकुमार पाटील (वय ४७, रा. कोगनोली, ता. चिकोडी, बेळगाव) यांंच्यासह मोहन उर्फ बंडू उत्तम भेगडे ( वय ६०, रा. वडगाव मावळ), बंडू लक्ष्मण फाटक (वय ५५, लोणावळा), अमोल विजय जाधव (वय ३५) आणि राहुल दशरथ जाधव (वय ४५, दोघे रा. पुसेगाव, खटाव, सातारा) यांना अटक करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी सांगितले.वैष्णवी हगवणे हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे (वय ५४), नणंद करिष्मा राजेंद्र हगवणे (वय ३१) यांना १७ मे रोजी अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सासरा राजेंद्र हगवणे (वय ६३), दीर सुशील यांना २३ मे रोजी अटक करण्यात आली आहे.

शशांक, लता आणि करिष्मा यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. वैष्णवीला पाईपने मारहाण केली. पोलिसांनी पाईप जप्त केला आहे. एक दुचाकी, हुंड्यात मिळालेली महागडी मोटार, चांदीची भांडी, दोन पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. पाच आरोपींची बँक खाती गोठविण्यात आली आहेत, अशी माहिती तपास अधिकारी बावधन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी न्यायालयात दिली.आरोपींनी हुंड्यामध्ये मिळालेले ५१ तोळे सोन्याचे दागिने एका बँकेत तारण ठेवले आहे. दागिने तारण ठेवण्यामागचे कारण काय? या प्रकरणाचा सखोल तपास करायचा असल्याने पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील नितीन अडागळे यांनी युक्तिवादात केली. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याचे आदेश दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शवविच्छेदन अहवालात काय?

वैष्णवीच्या अंगावर एकूण ३० जखमा आढळल्या आहेत. त्यापैकी २९ जखमा या शवविच्छेदनापूर्वीच्या आहेत. १५ जखमा या मृत्यूपूर्वी चोवीस तासांच्या आतील आहेत. एक जखम मृत्यूच्या चार ते सहा दिवस आधी झाली आहे. ११ जखमा या मृत्यूपूर्वी ५ ते ६ दिवसांपूर्वीच्या आहेत. दोन जखमा या तीन ते सहा दिवसांपूर्वीच्या आहेत, असे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे.