पिंपरी : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पसार असलेला सहआरोपी नीलेश चव्हाण याच्याविरोधात ‘लूक आउट’ नोटीस काढल्यानंतर पोलिसांनी आता त्याची मालमत्ता जप्त करण्यासाठी परवानगी मिळण्याकरिता न्यायालयात अर्ज केला आहे. न्यायालयाची परवानगी मिळताच ‘स्टँडिंग वॉरंट’ बजावण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात २४ मे रोजी कलमवाढ करून नीलेश चव्हाण यालाही सहआरोपी करण्यात आले. वैष्णवी यांच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच, वैष्णवी यांच्या मृत्यूनंतर कस्पटे कुटुंबीय दहा महिन्यांचे बाळ चव्हाण याच्याकडून आणण्यासाठी गेले असता, त्यांना चव्हाणने पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावले होते. त्या प्रकरणातही वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल आहे.

हे गुन्हे दाखल झाल्यापासून चव्हाण पसार आहे. तो पोलिसांना गुंगारा देत आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस दलाची पाच पथके त्याच्या मागावर आहेत. या पथकांनी विविध ठिकाणी तपास सुरू केला आहे. पुणे, मुंबई, कोकणासह कर्नाटक, गोव्यातही तपास केला जात आहे. त्याच्या संपर्कातील मित्र, नातेवाईक यांच्याकडेही कसून चौकशी केली जात आहे. परंतु, तो अद्याप पोलिसांना सापडलेला नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबत परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड म्हणाले, ‘नीलेश चव्हाण पसार आहे. त्याची मालमत्ता जप्त करण्यासाठी परवानगी मिळण्याकरिता न्यायालयाकडे अर्ज केला आहे. याबाबतची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.’