पुणे : पुणे-नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचे तातडीने निश्चित करण्यात आले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटनाची तारीखही ठरविण्यात आली आहे. त्यामुळे पुणे, नागपूर ही शहरे वेगवान प्रवासामुळे आणखी जवळ येणार आहे.
या रेल्वेला केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली होती. रेल्वे बोर्डाकडून येत्या महिनाभरात ही रेल्वे गाडी सुरू करण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, या रेल्वे गाडीचे वेळापत्रक ठरवून एक्स्प्रेसच्या उद्घाटनही तारीखही निश्चित ठरली आहे.
पुणे-नागपूर-पुणे या रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करावी, ही मागणी दोन वर्षांपासून करण्यात येत होती. याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीही लवकरच या मार्गावर ही गाडी सुरू करण्यात येईल, असे आश्वासन देऊन रेल्वे बोर्डाला सूचना केल्या होत्या. रेल्वे बोर्डाचे प्रधान सचिव सतीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी दृकश्राव्य माध्यमातून उच्चस्तरीय बैठक झाली होती.
या बैठकीत मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रकल्पांतर्गत ‘वंदे भारत एक्सप्रेस’ आणि ‘अमृत भारत एक्सप्रेस’ तसेच या योजनेतील स्थानकांच्या पुनर्बांधणीचा आढावा घेण्यात आला. यावेळी पुणे- नागपूर-पुणे या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली. त्यानुसार पुणे-नागपूर प्रवासात जवळपास तीन तासांनी कमी होणार आहे. सध्या अन्य एक्सप्रेस गाड्यांनी हा प्रवास पूर्ण करायला सुमारे १५ तास लागतात. मात्र, वंदे भारत एक्सप्रेस फक्त १२ तासांत हा प्रवास पूर्ण करील. त्यामुळे व्यवसायिक, विद्यार्थी आणि इतर प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे.
ही गाडी नागपूरहून सकाळी ९.५० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ९.५० वाजता पुण्यात पोहोचेल. मार्गात अजनी (नागपूर), वर्धा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड कॉर्ड लाईन आणि पुणे या प्रमुख स्थानकांवर थांबा असेल. सध्याच्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये बैठक आसनांची सुविधा असून, आरामदायी आसन व्यवस्था नाही. प्रवासाचा कालावधी जास्त असल्याने प्रवाशांनी आरामदायी आसनांची मागणी केली आहे, तर रेल्वे प्रशासनाने याची नोंद घेतली असून, याबाबत रेल्वे बोर्डाला प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पुणे आणि नागपूर या दोन महत्त्वाच्या शहरांना वेगवान प्रवासाने जोडणाऱ्या ‘वंदे भारत एक्सप्रेस’चा मुहूर्त ठरला आहे. रविवारी (१० ऑगस्ट) रोजी दृकश्राव्य माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील, अशी माहिती रेल्वे प्रसासनाकडून देण्यात आली. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.