मनसे अध्यक्ष राज ठाकरे शनिवारी (३० एप्रिल) पुण्यातील राजमहाल येथून सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास औरंगाबादच्या दिशेने रवाना झाले. त्यापूर्वी पुण्यात पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. त्यावेळी शहरातील १०० ते १५० पुरोहितांनी राज ठाकरे यांना पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद दिले. मात्र, यावेळी मनसे नेते वसंत मोरे गैरहजर होते. याबाबत विचारलं असता वसंत मोरे यांनी आपली भूमिका मांडली.
वसंत मोरे म्हणाले, “मी पोहोचेपर्यंत राज ठाकरे निघून गेले होते. त्यामुळे मला येण्यास उशीर झाला. त्यानंतर मी वढू तुळपूर येथे गेलो. मी सुरुवातीपासून औरंगाबाद येथे नियोजन केले होते, पण जिथे राजसाहेब असणार, तिथे वसंत मोरे असणार आहे. उद्याच्या सभेला मी जाणार आहे.”




राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत मुंबईतील सभेत भूमिका जाहीर केली. यावर मनसेचे तत्कालीन पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी उघडउघड नाराजी व्यक्त केली. त्यानंतर राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांना शहराध्यपदावरून बाजूला केले. त्यामुळे वसंत मोरे मनसेत राहणार की पक्षाला रामराम करणार याविषयी अनेत तर्कवितर्क लावले गेले.
हेही वाचा : “जातीयतेढ निर्माण करणाऱ्यांच्या पाठीशी एकेकाळी १४ आमदार होते, परंतु…”; अजित पवारांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
अखेर राज ठाकरे यांनी स्वतः वसंत मोरे यांना मुंबईला बोलावून नाराजी दूर केली. त्यामुळे आजच्या पुण्यातील कार्यक्रमाला वसंत मोरे निश्चित येतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, त्यांच्या गैरहजेरीने पुन्हा एकदा तर्कवितर्क लावले गेले.