पुणे : लोकसभेची निवडणूक लढविण्यास इच्छुक असतानाही पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नकारात्मक अहवाल दिल्यामुळे मनसेचा राजीनामा दिलेले माजी नगरसेवक वसंत मोरे यांची राजकीय पक्षांकडून उमेदवारी मिळविण्यासाठीची वणवण संपत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

यापूर्वी महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसकडून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या मोरे यांची मागणी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, संजय राऊत यांनी धुडकावून लावली. त्यानंतर सकल मराठा समाजाच्या बैठकीच्या माध्यमातून पाठिंबा मिळविण्याची चाचपणी त्यांनी केली. मात्र पदरी निराशा पडल्याने आता त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे दरवाजे ठोठावले आहेत.

हेही वाचा – अरुणाचल प्रदेशसह लक्षद्वीपमध्ये राष्ट्रवादीला घड्याळ चिन्ह मिळणार, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांचा दावा

वंचित बहुजन विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. वंचितकडून पुण्यातून उमेदवारी देण्याची मागणी त्यांनी केली. मात्र त्यावर आंबेडकर यांनी सावध भूमिका घेतली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत त्यासंदर्भातील निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.

हेही वाचा – काँग्रेसशी मैत्री पुरे ! कोल्हापुरातील सेनेच्या दोन्ही खासदार, पालमंत्र्यांना भाजप कार्यकर्त्यांनी सुनावले

लोकसभा निवडणूक लढविण्याची भावना मोरे यांनी मनसेत असताना सातत्याने व्यक्त केली होती. मात्र, मनसेच्या बाजूने पुण्यात सकारात्मक वातावरण नाही, असा अहवाल स्थानिक नेत्यांनी राज ठाकरे यांना दिला होता. त्यामुळे नाराज झालेल्या मोरे यांनी पक्षाचा राजीनामा देत लोकसभा निवडणूक लढविणारच असा निर्धार बोलून दाखविला होता. अनेक पक्षांच्या नेत्यांशी संपर्क झाला असल्याचे सांगत त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न केला होता. त्याचाच एक भाग म्हणून शरद पवार आणि ठाकरे गटाचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांची त्यांनी भेट घेतली होती.

हेही वाचा – “नाना पटोलेंनी पैसे घेऊन डॉ. प्रशांत पडोळेंना उमेदवारी दिली,” काँग्रेसच्या माजी आमदाराचा आरोप; म्हणाले, “भाजप उमेदवाराला…”

काँग्रेसकडून उमेदवारी मिळत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही त्यांनी काही दिवसांपूर्वी सकल मराठा समाजाच्या बैठकीला उपस्थित रहात पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोही अपयशी ठरला. त्यामुळे आता त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळविण्यासाठी पाठपुरावा केला आहे. त्यासंदर्भातील राजकीय गणितेही त्यांनी आंबेडकर यांच्या निदर्शनास आणून दिली आहेत. मात्र तूर्तास त्याबाबतचा निर्णय न झाल्याने त्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.