नारायणगाव : राज्यातील लोककलावंतांच्या उन्नतीसाठी ‘स्व. विठाबाई नारायणगावकर लोककला आर्थिक महामंडळ’ स्थापन करावे, तसेच तमाशाची कला पंढरी असलेल्या नारायणगाव येथे विठाबाई नारायणगावकर यांचे स्मारक उभारावे, अशी मागणी विठाबाईंचे नातू मोहित नारायणगावकर यांनी केली आहे.
याबाबत नारायणगावकर यांनी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडे निवेदन दिले. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, आमदार अमोल मिटकरी, राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील, प्रदेश उपाध्यक्ष नितीन धवणे पाटील, अभिनेत्री अपेक्षा चव्हाण आदी या प्रसंगी उपस्थित होते.
‘राज्यातील पहिला तमाशा महोत्सव २००६ मध्ये नारायणगाव येथे झाला होता. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी नारायणगाव या ठिकाणी कृष्णा खोरे महामंडळाच्या दोन एकर जागेवर विठाबाई नारायणगावकर यांचे स्मारक करण्याचे जाहीर केले होते. मात्र, अद्याप अंमलबजावणी झालेली नाही,’ असे नारायणगावकर यांनी सांगितले.
‘राज्यात तमाशा, जागरण-गोंधळ, वाघ्या-मुरळी, खडीगंमत वगनाट्य, गोंधळी, वासुदेव, पिंगळा, पोतराज, बहुरूपी, कलगी-तुरा, भारुड, पोवाडा, नंदीवाले, दशावतार, नमन, कोळी नृत्य, डोंबाऱ्याचा खेळ, झाडेपट्टी, वारली चित्रकार, भजन, कीर्तन, आदिवासी नृत्य, रोडाली, खान्देशी तमाशा, लावणी, संगीत बारी आदी लोककला अस्तित्वात आहेत. महामंडळ स्थापन झाल्यास या कलाकारांना आधार मिळू शकेल,’ असे नारायणगावकर यांनी स्पष्ट केले.