भांडारकर संस्थेतर्फे व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम; कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचा पुढाकार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विद्याधर कुलकर्णी, पुणे</strong>

प्राच्यविद्या क्षेत्रातील अभ्यासकांना भरीव उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. अभ्यासकांना चरितार्थासाठी पुरेसे पैसे उपलब्ध व्हावेत या उद्देशातून मंत्रालयातर्फे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेला व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांची रचना करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी नुकतीच भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेला भेट देत संस्थेच्या विविध प्रकल्पांची माहिती घेतली. ‘प्राच्यविद्या क्षेत्रातील अभ्यासकांना चरितार्थापुरता पैसा मिळतो का’, असा प्रश्न हेगडे यांनी संस्थेचे मानद सचिव डॉ. श्रीकांत बहुलकर यांना केला. उपजीविकेची शाश्वती नसेल तर अभ्यासक या ज्ञानक्षेत्राकडे मोठय़ा संख्येने वळणार नाहीत याकडे हेगडे यांनी लक्ष वेधले. ‘संस्थेने प्राच्यविद्या अभ्यासकांच्या अर्थार्जनासाठी व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांची रचना करावी. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय त्याला तातडीने मंजुरी देईल’, असे हेगडे यांनी सांगितले, अशी माहिती डॉ. बहुलकर यांनी दिली.

डॉ. बहुलकर म्हणाले, की विविध पर्यटन स्थळांची आणि त्या स्थळाच्या इतिहासाची नेमके पणाने माहिती देणारेअभ्यासू गाईड घडविणे, सांस्कृतिक ठेव्याची देखभाल आणि जतनासाठी युवकांना प्रशिक्षण देणे, प्राचीन हस्तलिखिते व दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायझेशनसाठी मनुष्यबळ घडविणे, त्याचप्रमाणे संग्रहालय क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी संग्रहालयशास्त्राचा अभ्यास असे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे. त्याबरोबरीने संस्कृत, प्राकृत, पाली या भाषांचे पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याचाही प्रस्ताव विचाराधीन आहे.

त्याला आता केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाचे पाठबळ आणि प्रोत्साहन लाभत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी पुढाकार घेतल्यामुळे ही गोष्ट सुकर होणार आहे.

त्याला लवकर मंजुरी मिळेल अशी अपेक्षा आहे. अभ्यासकांना चरितार्थाचे साधन लाभल्यानंतर किमान दहा टक्के विद्यार्थी संशोधन क्षेत्राकडे वळतील, अशी आशा वाटते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vocational courses by bhandarkar institute
First published on: 19-01-2019 at 01:59 IST