पुणे : पुण्यात नांदेडगाव परिसरात गुइलेन बॅरे सिंड्रोमचा उद्रेक झाला आहे. या परिसरातील पाण्याचे नमुने रासायनिक आणि जैविक तपासणीसाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. त्यातील ५५ ठिकाणचे पाणी नमुने दूषित आढळले असून, ते पिण्यास अयोग्य असल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, जीबीएसच्या रुग्णसंख्येतील वाढ सुरूच असून, एकूण रुग्णसंख्या १८४ वर पोहोचली आहे.

आरोग्य विभागाने जीबीएसचे रुग्ण आढळून आलेल्या परिसरातील पाण्याचे नमुने आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविले होते. नांदेडगाव परिसरात जीबीएसचा उद्रेक झाला असल्याने तेथील सर्वाधिक नमुने होते. या पाण्याच्या नमुन्यांची रासायनिक आणि जैविक तपासणी राज्य आरोग्य प्रयोगशाळेने केली. एकूण ४ हजार ७६१ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील ५५ पाणी नमुने दूषित आढळले असून, ते पिण्यास अयोग्य असल्याचा निष्कर्ष प्रयोगशाळेने काढला आहे. पिण्यास अयोग्य आढळलेले सर्व नमुने नांदेड गाव परिसरातील आहेत, अशी माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली.

राज्यात पुणे विभागात जीबीएसचे सर्वाधिक १७६ रुग्ण आहेत. त्यात पुणे महापालिका ३७, महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेली गावे ८९, पिंपरी-चिंचवड महापालिका २६, पुणे ग्रामीण २४ आणि इतर जिल्ह्यांतील ८ रुग्ण आहेत. आतापर्यंत जीबीएसमुळे ६ जणांचा मृत्यू झाला आहे. जीबीएसच्या ४७ रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, २१ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. राज्यभरात ८९ रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी गेले आहेत.

महापालिकेकडून नांदेडगाव परिसरातील चिकनचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेत (एनआयव्ही) पाठविण्यात आले आहेत. याचबरोबर अन्न औषध व प्रशासनाने नांदेड गाव परिसरातील हॉटेलमधून खाद्यपदार्थांचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविले आहेत. याचबरोबर रुग्णसंख्या जास्त असलेल्या भागात आरोग्य विभागाकडून रुग्णांचे सर्वेक्षण सुरू आहे. पुणे महापालिकेने ४६ हजार ५३४ घरांचे सर्वेक्षण केले असून, पिंपरी-चिंचवड महापालिकेने २४ हजार ८८३ आणि पुणे ग्रामीणने १३ हजार २९१ अशा एकूण ८४ हजार ७०८ घरांचे सर्वेक्षण केले आहे.

जीबीएस रुग्णसंख्या

एकूण रुग्ण – १८४

अतिदक्षता विभागात दाखल – ४७

व्हेंटिलेटरवरील रुग्ण – २१

बरे झालेले रुग्ण – ८९

एकूण मृत्यू – ६

वयोगटनिहाय रुग्णसंख्या

वयोगट – रुग्ण

० ते ९ – २३

१० ते १९ – २१

२० ते २९ – ४२

३० ते ३९ – २३

४० ते ४९ – २६

५० ते ५९ – २६

६० ते ६९ – १६

७० ते ७९ – ३

८० ते ८९ – ४ एकूण – १८४

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.