गणेशोत्सव आणि गौरी पूजन कार्यक्रमाच्या दिवशीच पेठांसह निम्म्या पुण्याचा पाणीपुरवठा रविवारी विस्कळीत झाला. सहकारनगर, पर्वती भागात तर रविवारी सायंकाळी सहा वाजले तरी पाणीपुर‌वठा होऊ शकला नाही. ऐन सणासुदीच्या काळातच पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. विस्कळीत पाणीपुरवठ्यावरून मात्र महापालिका आणि महावितरण यांनी एकमेकांकडे बोट दाखविले आहे.दोन वर्षानंतर शहरात निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत आहे. गणपतीबरोबर घरोघरी गौरींचे आगमन झाले आहे. मात्र सण असूनही पाणीपुरवठा होऊ न शकल्याने रविवारी शहरातील हजारो नागरिकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. ऐन सणातच पाणी न आ्लयाने महिलांची तारांबळ उडाली. विस्कळीत पाणीपुरवठ्याबाबतच्या शेकडो तक्रारी महापालिकेकडे करण्यात आल्या.

हेही वाचा >>> पिंपरी: विजेचा खेळखंडोबा, अघोषित भारनियमनामुळे उद्योगनगरीत लघुउद्योजक त्रस्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पर्वती जलशुद्धीकरण केंद्राला वीजपुरवटा करणाऱ्या वाहिनीमध्ये रविवारी सकाळी बिघाड झाला. त्यातून वीज पुरवठा खंडीत झाल्याने पाणीपुरवठा होऊ शकला नाही. शहरातील पेठांमध्ये, तसेच लगतच्या उपनगरांला गौरी पूजनावेळी पाणी मिळू शकले नाही. रविवारी सायंकाळपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकला नव्हता. पर्वती जलकेंद्रातून लष्कर जलकेंद्राला पाणीपुरवठा केला जातो. पर्वती जलकेंद्रात बिघाड झाल्याने लष्कर जलकेंद्रावर अवलंबून असेलल्या पूर्व भागालाही त्याचा फटका बसला. महापालिकेचा पाणीपुरवठा विभागाकडून महिन्यातून काही दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला जातो. देखभाल दुरुस्तीचे कारण त्यासाठी पुढे केले जाते. मात्र त्यानंतरही बिघाड कसा होतो, अशी विचारणा नागरिकांकडून करण्यात आली.
महावितरणाच्या वाहिनीमध्ये रविवारी सकाळी बिघाड झाला होता. त्यामुळे पाण्याच्या टाक्या पूर्ण क्षमतेने भरल्या गेल्या नाहीत. त्यामुळे पाणीपुरवठा करण्यात अडचणी निर्माण झाल्या. मात्र बिघाड दुरुस्त झाल्यानंतर ज्या भागाला पाणीपुरवठा होऊ शकला नाही त्या भागाला तातडीने पाणीपुरवठा करण्याची सूचना देण्यात आली आहे, असे माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरूद्ध पावसकर यांनी दिली. दरम्यान, पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातील वाहिनीत झालेल्या बिघाडाची जबाबदारी महापालिकेची आहे. पाणीपुरवठा विस्कळीत होण्यास महापालिकाच जबाबदार आहे, असा दावा महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आला.