पुणे : नावीन्यपूर्ण संशोधनाला चालना देऊन तंत्रज्ञान विकसित करून ते सर्वसामान्य माणसापर्यंत त्याच्या भाषेत, त्याला समजेल अशा स्वरूपात पोहोचवणे महत्त्वाचे आहे. या कामी देशातील निवृत्त हवामानशास्त्रज्ञ योगदान देऊ शकतात. त्यांचा अनुभव, त्यांच्या ज्ञानाचा समाजासाठी अद्याप योग्य वापर होत नाही.

शेतकरी, सर्वसामान्यांपर्यंत हवामान अंदाज त्यांच्या भाषेत पोहोचवण्यासाठी यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे, असे मत पृथ्वीविज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. रविचंद्रन यांनी मांडले. हवामान अंदाज ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. त्यात १०० टक्के यश मिळणे शक्य नाही. त्यात काय शक्यता आहेत, काय मर्यादा आहेत हे सर्वसामान्यांना समजावून सांगितले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेत (आयआयटीएम) इंट्रोमेट २०२५ या परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात रविचंद्रन बोलत होते. भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा, आयआयटीएमचे संचालक डॉ. सूर्यचंद्र राव, इंडियन मेटिओरॉलॉजी ससोसायटीचे (आयएमएस) अध्यक्ष डॉ. आनंद कुमार शर्मा या वेळी उपस्थित होते. इंडियन मेटिओरॉलॉजीकल सोसायटीच्या ‘वायूमंडल’ या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. तसेच ‘इंडियन इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हल’बाबतची (आयआयएसएफ) माहिती देण्यात आली. तसेच याच कार्यक्रमात विविध पुरस्कारही प्रदान करण्यात आले.

रविचंद्रन म्हणाले, हवामानाबाबत दिले जाणारे अंदाज देशभरातील शेतकरी, स्थानिक पातळीवर पोहोचतात का, ते त्यांना समजतात का याचा अभ्यास करायला हवा. हवामान अंदाज प्रणालीतील उणीवांची रचनात्मक समीक्षा करून उपाय सुचवणे महत्त्वाचे असून, निरीक्षण ते हवामान अंदाजांचे प्रसारण ही साखळी सुधारण्याची गरज आहे. त्यात आयएमएस दुवा म्हणून काम करू शकते. त्यासाठी देश-विदेशातील शास्त्रज्ञ, प्राध्यापकांच्या मदतीने प्रशिक्षण कार्यक्रम राबवता येतील. त्यासाठी निवृत्त शास्त्रज्ञांनी पुढे येऊन प्रस्ताव सादर केल्यास त्यास मंत्रालयाकडून निधी देता येऊ शकेल.

मिशन मौसम अंतर्गत निरीक्षणांमध्ये वाढ करून जागतिक पातळी ते ग्रामपंचायतीपर्यंत नेण्यात येत आहेत. या सर्व स्तरावर उच्च क्षमता असायला हवी. काय उपग्रह असावेत, ४जीनंतर काय हवे, आयओटी सेन्सर्स, प्रत्येक पंचायतीत किमान एक निरीक्षण केंद्र या सगळ्याचा विचार केला पाहिजे. संख्यात्मक प्रारुपांना मर्यादा आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंगचा समावेश करण्यात येत आहे. मात्र, शेवटचा निर्णय मानवी बुद्धिमत्ताच घेते.

हवामान अंदाजांमध्ये अनेक आव्हाने आहेत. नाऊकास्ट ते दशकापर्यंतचा हवामान अंदाज दिला जातात. मात्र, अचूक हवामान अंदाज मिळावा ही लोकांची अपेक्षा आहे. २०१९पासून जिल्हास्तरावर हवामान अंदाज सुरू करण्यात आले आहेत. हवामान प्रारुपांमध्येही बदल करण्यात येत आहे. त्याशिवाय हवामानामुळे होणारे मुख्य आणि दुय्यम धोकेही सांगितले पाहिजेत. त्यासाठी डिजिटल एकात्मिक प्रणाली असू शकेल. त्यातून वेगवेगळ्या भाषांमध्ये माहिती देता येऊ शकेल, असे महापात्रा यांनी नमूद केले.