पुणे: ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’च्या (जीबीएस) वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ‘ईएसआर’ (उन्नत पाण्याच्या टाक्या) आणि ‘जीएसआर’ (भूमिगत पाण्याच्या टाक्या) टाक्यांची स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरात सुमारे ३५० ‘ईएसआर’ आणि ‘जीएसआर’ टाक्या असून, महिनाभरात त्यांची स्वच्छता केली जाणार आहे. या पाण्याच्या टाक्यांतून शहरातील विविध भागांत पाणीपुरवठा केला जातो. या स्वच्छतेसाठी टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी ही माहिती दिली.

‘जीबीएस’ आजाराला कारणीभूत असलेले जीवाणू ‘जीबीएस’चा हाॅटस्पाॅट असलेल्या भागातील वेगवेगळया ठिकाणच्या पाण्याच्या नमुन्यांत सापडले आहेत. मात्र, त्याचा नेमका स्रोत सापडलेल नाही. त्यामुळे तूर्तास महापालिकेकडून या साथीला अटकाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय केले जात आहेत. या उपायांचाच एक भाग म्हणून महापालिका प्रशासनाने टाक्यांच्या स्वच्छतेचा हा निर्णय घेतला आहे. महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

टाक्यांची स्वच्छता करताना त्यामधील गाळ काढून टाकी स्वच्छ केली जाणार आहे. ही स्वच्छता करताना संबंधित टाकीतून पाणीपुरवठा होणारा ठरावीक भाग वगळता इतर दैनंदिन कामांवर परिणाम होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनास देण्यात आल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी म्हणाले, शहरातील विविध भागांना पाणीपुरवठा करणाऱ्या टाक्यांची स्वच्छता करण्याचा आदेश महापालिका आयुक्तांनी दिला आहे. टाक्यांच्या परिसरात स्वच्छता, तसेच भूमिगत मलवाहिन्या, सांडपाणी वाहिन्यांची स्थिती कशी आहे, याची तपासणीही केली जाणार आहे. नागरिकांना दैनंदिन केला जाणारा पाणीपुरवठा विस्कळीत न होता हे काम केले जाईल.