पुणे : भारतात तरुण वयोगटात हृदय आणि चयापचयाशी निगडित आजार वाढू लागले आहेत. देशातील आठपैकी एका तरुणाला मधुमेहाची बाधा असल्याचा धक्कादायक निष्कर्ष न्यूबर्ग डायग्नोस्टिकच्या अहवालातून समोर आला आहे. देशातील उत्तर भागाच्या तुलनेत पश्चिम आणि दक्षिण भागात मधुमेहींचे प्रमाण अधिक असल्याचेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
जगभरातील हृदय आणि रक्तासंबंधीच्या आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी एक पंचमांश मृत्यू भारतात होत आहेत. देशात मधुमेह आणि शरीरातील कोलेस्टेरॉलच्या पातळीत होणारी अनियमित वाढ या दोन प्रमुख कारणांमुळे तरुण भारतीयांचा हृदयविकारामुळे मृत्यू ओढावू लागला आहे. न्यूबर्ग डायग्नोस्टिक्सने भारतीयांमधील तरुण वयोगटातील वाढत्या हृदय आणि चयापचयासंबंधित आजारांविषयी संशोधन केले आहे. न्यूबर्ग डायग्नोस्टिकने गेल्या वर्षभरात बंगळुरू, चेन्नई, अहमदाबाद, मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि केरळमधील १२.५ लाख जणांच्या रक्तांचे नमुने तपासणीसाठी घेतले. या नमुन्यांची मधुमेहदर्शक आणि लिपीड प्रोफाईल तपासणी करण्यात आली. वार्षिक आरोग्य तपासणीसाठी आलेल्या ग्राहकांच्या नमुन्यांतून ही तपासणी करण्यात आली.
न्यूबर्गकडे रक्त तपासणीसाठी आलेल्यांमध्ये २५ ते ३५ वयोगटातील २.२ लाख व्यक्तींचा समावेश होता. त्यांच्या तपासणी अहवालांच्या विश्लेषणातून समोर आलेले निष्कर्ष चिंताजनक आहेत. यानुसार, देशातील १३ टक्के तरुणांना मधुमेहाची बाधा आहे, तर २५ टक्के तरुण मधुमेहपूर्व स्थितीत आहेत. याचबरोबर २८ टक्के तरुणांच्या शरीरात कोलेस्टेरॉलची जास्त पातळी आहे. दक्षिण आणि पश्चिम भारतातील तरुणांमध्ये मधुमेहाचे प्रमाण १४ टक्क्यांपर्यंत आढळले. उत्तर भारतातील ९ टक्के तरुणांना ही बाधा होती. भौगोलिक पातळीवर ही टक्केवारी असमान असली तरीही चिंताजनक आहे.
तरुणांमधील वाढता मधुमेह आणि वाढत्या कोलेस्टेरॉलच्या पातळीबद्दल न्यूबर्ग डायग्नोस्टिक्सचे वैद्यकीय संचालक डॉ. सुजय प्रसाद म्हणाले की, आमच्या संशोधनातून समोर आलेली माहिती चिंताजनक आहे. आम्ही तपासलेल्या प्रत्येकी ८ तरुणांपैकी एकाला मधुमेहाची बाधा होती. चारपैकी एक तरुण मधुमेहपूर्व अवस्थेत होता. मधुमेह हा भारतात चुकीच्या जीवनशैलीमुळे वेगाने पसरणारा आजार ठरू लागला आहे. वेळेवर वैद्यकीय उपचार घेणे आता ऐच्छिक पर्याय राहिलेला नाही. तरुणांचे आरोग्य जपण्यासाठी तसेच वेळेआधी होणाऱ्या हृदयविकाराचा आजार प्रतिबंधित करण्यासाठी वैद्यकीय उपचारात दिरंगाई करता कामा नये.
नियमित तपासणी गरजेची
मधुमेह, उच्च रक्तदाब, शरीरातील वाढती कोलेस्टेरॉलची पातळी हे आजार शांतपणे शरीरभर पसरतात. त्यांच्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांचे नुकसान होते. ही प्रक्रिया सुरू असताना शरीर कोणतेही संकेत देत नाही. म्हणून प्रतिबंधात्मक आरोग्य तपासण्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. नियमित तपासणीमुळे प्राथमिक पातळीवरील मधुमेहाला सुरुवात झाल्यास लवकर माहिती मिळते. शरीरातील अनावश्यक चरबीमुळे होणाऱ्या धोक्यांवर मर्यादा आणता येते. जीवनशैलीत वेळेत सकारात्मक बदल केल्यास, वेळेवर प्रतिबंधात्मक उपचार केल्यास या आजारांवर प्रभावीपणे नियंत्रण मिळवता येते. २५ ते ३५ वयोगटातील वाढता मधुमेह आणि रक्तासंबंधीच्या आजारांमुळे आता हे आजार केवळ वृद्धांपुरता मर्यादित नसल्याचे दिसून आले आहे, याकडे अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे.