पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेला समांतर असलेला चार पदरी रस्ता सहा पदरी करण्यात येणार आहे. त्यासाठी ६२८ कोटींचा आराखडा पीएमआरडीएने केला आहे. त्यासंदर्भातील निविदा प्रक्रियाही राबविण्यात आली असून, सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे.

पीएमआरडीएकडून शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेचे काम हाती घेण्यात आले आहे. येत्या काही महिन्यांत या मार्गावरील मेट्रोची प्रवासी सेवा सुरू होणार आहे. सध्या मेट्रोच्या कामांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे मेट्रो मार्गिका सुरू झाल्यानंतर सेवा रस्त्यावरून वाहतुकीचे नियोजन करण्याच्या दृष्टीने अस्तित्वातील चार पदरी रस्ता सहा पदरी करण्यात येणार आहे.

या मार्गिकेला समांतर असणारा ५० किलोमीटर लांबीचा रस्ता सिमेंटचा करून तो सहा पदरी केला जाणार आहे. बस बे, सायकल मार्ग, पदपथ आणि दुचाकीं लावण्यासाठी जागाही या माध्यमातून निर्माण करण्यात येणार आहे. त्यासाठी काही ठिकाणी भूसंपादन केले जाणार असल्याची माहिती पीएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

या प्रकल्पासाठी सर्वेक्षण, रेखांकन करण्यात येणार असून त्यासाठी सल्लागाराची नियुक्तीही करण्यात येणार आहे. या सेवा रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येणार असल्याने भविष्यात वाहतूक कोंडी कमी होईल, असा दावा पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.

बस आणि पूरक सेवेसाठी स्वतंत्र मार्ग, पार्किंगची सुविधा देणे या रुंदीकरणामुळे शक्य होणार असून शेवटच्या टपप्प्यापर्यंत दळणवळण सुलभ करता येणार आहे. प्रकल्पाच्या आराखड्यानुसार ६२८ कोटींचा खर्च अपेक्षित असून त्यामध्ये भूसंपादनाचाही खर्चही समाविष्ट करण्यात आला आहे. मात्र सल्लागाराची नियुक्ती करण्यात आल्यानंतर या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.

प्रकल्पाला विरोधाची शक्यता ?

शहरातील खासगी वाहनांची संख्या कमी करण्यासाठी आणि सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्यासाठी शहरात मेट्रो मार्गिका उभारण्यात येत आहेत. मात्र, या परिस्तितीत मेट्रो मार्गिकेला समांतर रस्त्यांचे रुंदीकरणाला विरोध होण्याची शक्यता आहे.