पुणे : मृत्युपत्र कसे करावे, ते करताना काय काळजी घ्यावी, त्या संदर्भातील कायदा काय आहे, याची अनेकांना कल्पना नसल्याने आणि झालेल्या मृत्युपत्रानंतर होणारे वाद टाळण्यासाठी राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने आता मृत्युपत्राची घरी जाऊन नोंदणी करण्याचा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील पहिला प्रयोग पुण्यात सुरू करण्यात आला असून, याबाबत नागरिकांना घरी जाऊन मार्गदर्शन करण्यात येत आहे.
कुटुंबातील प्रमुख व्यक्तीच्या निधनानंतर मालमत्तेवरून कुटुंबात वाद निर्माण होण्याची शक्यता असते. ती टाळण्यासाठी, तसेच हयात असताना मर्जीनुसार मालमत्तेची योग्य वाटणी करण्यासाठी मृत्युपत्र महत्त्वाचे ठरते. मात्र, मृत्युपत्र कसे तयार करावे, ते करताना काेणती काळजी घ्यावी, त्या संदर्भात कायद्यातील नियम आणि तरतुदी काय आहेत, याची अनेकांना कल्पना नसते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन याबाबत मार्गदर्शन करून नोंदणी करण्यात येणार आहे. या प्रयोगाची सुरुवात पुण्यापासून झाली आहे.
राज्य शासनाच्या शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा उपक्रमांमध्ये सहजिल्हा निबंधक पुणे शहर कार्यालयाने विविध उपक्रम राबविले होते. त्यातील ‘साईराम’ या उपक्रमांतर्गत ‘आदर’ (रिस्पेक्ट) या संकल्पनेनुसार ज्येष्ठ नागरिकांना मृत्युपत्रासंदर्भात मार्गदर्शन करण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात महंमदवाडी येथील ‘सोनाश्रय वृद्धाश्रमा’ला सहजिल्हा निबंधकांनी भेट देऊन तेथील ज्येष्ठ नागरिकांना मृत्युपत्रासंदर्भात माहिती दिली होती. यापुढील टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना माहिती हवी असल्यास त्यांच्या घरी जाऊन ती दिली जाणार आहे.
‘ज्येष्ठ नागरिकाला मृत्युपत्र नोंदणी करायची असेल आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्याला दुय्यम निबंधक कार्यालयात येणे अशक्य असेल, तर त्यासाठी गृहभेट हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे,’ असे शहर सहजिल्हा निबंधक संतोष हिंगाणे यांनी सांगितले.
या योजनेनुसार संबंधितांना त्यांच्या जवळच्या दुय्यम निबंधक कार्यालयातील वकील किंवा अन्य प्रतिनिधीच्या माध्यमातून संपर्क साधावा लागणार आहे. मृत्युपत्राच्या अर्जाचा नमुना विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. मृत्युपत्र करणारी व्यक्ती आजारी असली, तरी मृत्युपत्र करण्यासाठी मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याचे डॉक्टरांचे प्रमाणपत्र अर्जाबरोबर जोडणे आवश्यक आहे. त्यासाठी अर्ज केल्यानंतर दुय्यम निबंधकांकडून दोन ते तीन दिवसांमध्ये वेळ दिली जाईल. गृहभेटीसाठी तीनशे रुपये शुल्क आकारले जाणार आहे. गृहभेटीसाठी जाताना आणि गृहभेट प्रक्रियेचे चित्रीकरण करून त्याची सीडी मृत्युपत्र करणाऱ्याकडून दुय्यम निबंधकांना दिली जाणार आहे.
घरी मृत्युपत्र नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी नोंदणी विभागाच्या सारथी या काॅल सेंटरच्या ८८८८००७७७७ या क्रमांकावर संबंधितांनी संपर्क साधावा. – संतोष हिंगाणे, शहर सह जिल्हा निबंधक, नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग