पुणे : कात्रज भागातील आंबेगाव बुद्रुक परिसरात एका महिलेचा खून करून तिचा मृतदेह सेवा रस्त्यावर असलेल्या नाल्याजवळ टाकून देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामागचे कारण समजू शकले नाही.
प्रीती सचिन वखारे (वय ३१, रा. खोपडेनगर, कात्रज) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक समीर कदम (वय ४२) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात शहरात पाऊस सुरू होता. २१ मे रोजी आंबेगाव बुद्रुक परिसरातील धबाडी येथील सेवा रस्ता परिसरात असलेल्या नाल्याजवळ एका महिलेचा मृतदेह पडल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोेलिसांनी भेट दिली.
महिलेची ओळख पटलेली नव्हती. सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली होती. पोलिसांनी ओळख पटविली. मृतावस्थेत सापडलेली महिला कात्रजमधील खोपडेनगर भागातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली. शवविच्छेदन अहवालात वखारे हिच्या डोक्यात तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले. त्यानंतर या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वखारे हिच्या खुनामागचे कारण समजू शकले नाही. पसार झालेल्या आरोपीचा माग काढण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळराम साळगावकर यांनी दिली.