पुणे : महिला प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि सुलभ व्हावा, या उद्देशाने पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) महिला विशेष बससेवांमध्ये वाढ केली आहे. गुरुवारपासून (१२ जून) कात्रज, हडपसर, स्वारगेट, भेकराईनगर अशा विविध १९ मार्गांवर महिला प्रवाशांसाठी विशेष ‘पीएमपी’ धावणार आहे. त्यामुळे केवळ महिलांसाठी पीएमपी सेवा देणारे ३३ मार्ग झाले आहेत. सद्य:स्थितीत १६ बसद्वारे १४ मार्गांवर महिलांसाठी बस धावत आहे.

सद्य स्थितीला पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) कार्यक्षेत्रापर्यंत ३८१ मार्गांवर दररोज बस संचलन होत आहे. त्यापैकी १४ मार्गांवर महिलांसाठी स्वतंत्र विशेष बस सेवा सुरू आहे. दैनंदिन प्रवासातील गर्दी, महिला-विद्यार्थिनींची होणारी छेडछाड, मौल्यवान दागिन्यांची चोरी, लज्जास्पद वर्तन आणि अनेक गैरप्रकारांबाबत महिला प्रवाशांकडून वारंवार तक्रारी येतात. हे गैरप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पोलिसांचे स्वतंत्र पथक करण्यात आले असताना ‘पीएमपी’ प्रशासनाने महिलांसाठी विशेष सेवा देणाऱ्या मार्गांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १९ नवीन मार्ग निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती ‘पीएमपी’ प्रशासनाने दिली.

कोणत्या आगारातून कोठपर्यंत?

कात्रज, अप्पर डेपो, भेकराईनगर, स्वारगेट, निगडी, बाणेर, शेवाळवाडी, हडपसर, चऱ्होली, न. ता. वाडी, भेकराईनगर, भोसरी या आगारांमधून आळंदी, मुक्ताई चौक, धायरी डीएसके, महानगरपालिका भवन, पुणे स्थानक, पिंपळे गुरव, निगडी, लोहगाव, वाघोली, पिंपरी-चिंचवड गांव, हिंजवडी माण फेज तीन या ठिकाणांपर्यंत १९ मार्ग निश्चित केले आहे. सकाळी ९ पासून सायंकाळी साडेसहापर्यंत महिलांच्या विशेष बसचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. या फेऱ्यांचे नियोजन करताना उर्वरित मार्गांवरील फेऱ्यांमध्ये कुठलाच बदल करण्यात आलेला नसल्याचे पीएमपी प्रशासनाने नमूद केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रवाशांची गर्दी आणि महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने ‘पीएमपी’ प्रशासनाने महिला विशेष बस सेवेच्या मार्गांमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे महिलांची सुरक्षितता निश्चित होणार असून, सुलभ प्रवास करता येईल. – दीपा मुधोळ-मुंडे, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल.