पुणे : भाजपाचे ज्येष्ठ नेते, खासदार गिरीश बापट यांचे आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. बापट यांच्यावर संध्याकाळी सातच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. गिरीश बापट यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून आणि नात असा परिवार आहे.
हेही वाचा – पुणे : दहशत माजविणाऱ्या गुंडाविरुद्ध ‘एमपीडीए’अंतर्गत कारवाई; नाशिक कारागृहात स्थानबद्ध
पुणे शहराच्या राजकीय वर्तुळात सर्वपक्षीय नेत्यांसोबत भाजपाचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचे एक वेगळेच स्थान राहिले आहे. नगरसेवक ते खासदारपदापर्यंत त्यांचा प्रवास हा थक्क करणारा राहिला आहे. राजकीय जीवनात प्रवेश करण्यापूर्वी गिरीश बापट टेल्को कंपनीत कामगार म्हणून कामाला देखील होते. १९८३ ते २०२३ पर्यंत पुणे
कसबा विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा २८ वर्षापासुन गड राहिला, इथे भाजपाची घोडेदौड कायम ठेवण्याचं काम गिरीश बापट यांनी केलं. लोकसभेत पाऊल ठेवल्यावर कसबाचे प्रतिनिधीत्व मुक्ता टिळक यांच्याकडे आलं. आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पोटनिवडणुक जाहीर करण्यात आली, त्यावेळी हेमंत रासने यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली.
आजवरच्या प्रत्येक निवडणुकीत सहभागी राहणारे, प्रत्येक कार्यकर्त्यां सोबत संवाद साधणारे गिरीश बापट हे तब्येत ठीक नसल्याने या निवडणुक प्रचारापासून दूर राहतील अशी शक्यता होती. पण तब्येत ठीक नसताना देखील त्यांनी प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यां सोबत संवाद ठेवण्याचं काम केलं. केसरीवाडा येथे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेत भाषण देखील केलं. त्यावेळी गिरीश बापट यांना श्वास घेण्यास त्रास होत होता, बाजूला ऑक्सिजन सिलेंडर ठेवण्यात आला होता, गिरीश बापट यांचे ते भाषण ऐकताना सर्वांना अश्रू अनावर झाले होते. गिरीश बापट भाषण करूनच थांबले नाही तर व्हीलचेअर येऊन मतदानाचा हक्क बजावत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्याचं काम केलं.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर विजयी झाल्यानंतर त्यांनी गिरीश बापट यांची भेट घेतली होती. विरोधी पक्षातील कार्यकर्ता निवडून आल्यावर त्याला शुभेच्छा देणारा नेता, अखेरच्या श्वासापर्यंत लढणारा कार्यकर्ता म्हणून गिरीश बापट यांनी ओळख कायम ठेवली.
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.