पुणे : दृश्यकलेच्या क्षेत्रात आलेले अनुभव इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी लेखन करत आलो, अशी भावना ज्येष्ठ दिग्दर्शक आणि कलामर्मज्ञ अरुण खोपकर यांनी व्यक्त केली.डॉ रा. चिं. ढेरे संस्कृती संशोधन केंद्र आणि राजहंस प्रकाशन यांच्या वतीने एका अनौपचारिक समारंभात खोपकर यांना श्रीगमा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी खोपकर बोलत होते.

डॉ. रा. चिं. ढेरे संस्कृती संशोधन केंद्राच्या अध्यक्षा आणि प्रसिद्ध कवयित्री डाॅ. अरुणा ढेरे, राजहंस प्रकाशनाचे प्रमुख दिलीप माजगावकर, रेखा माजगावकर, निवड समितीचे सदस्य डॉ. सदानंद बोरसे आणि चित्रकार विकास गायतोंडे उपस्थित होते. चाळीस हजार रुपयांचा धनादेश, शाल आणि श्रीफळ देऊन खोपकर यांना यावेळी गौरवण्यात आले. डॉ. रा. चिं. ढेरे संस्कृती संशोधन केंद्रातर्फे पैसाच्या खांबाचे मानचिन्हही त्यांना या वेळी देण्यात आले. 

हेही वाचा : पुणे : सत्ताधाऱ्यांना पवारांची संगत नकोशी?; मेळाव्याकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषिमंत्र्यांनी फिरवली पाठ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खोपकर म्हणाले, एखाद्या गोष्टीचा तीन दशके शोध घेताना मिळालेला आनंद इतरांना कळावा, मिळावा म्हणून  मी लेखनाकडे वळलो. मुद्दाम सोपेपणा आणला नाही, मात्र, अनुभवाला विशिष्ट परिभाषेत न अडकवता त्याला योग्य अशी भाषा शोधत गेलो. अनियतकालिकांच्या चळवळीतले मित्र मिळाले आणि एकत्र चर्चांमधून केवळ लेखनात आणि भाषेतच नव्हे तर विचारांमधे आणि त्यांच्या मांडणीमधेही मोकळेपणा आला.
डॉ. ढेरे म्हणाल्या, कलांचे आंतरसंबंध उलगडणारे खोपकर यांचे लेखन कलाक्षेत्रातल्या रूढ परिभाषेपलिकडे जात आपल्या जाणिवांच्या कक्षा रुंदावणारे आहे. माजगावकर म्हणाले, अलिकडच्या काळात दुर्मीळ असा भाषेचा नितळपणा आणि कलाक्षेत्रात  खोपकरांनी आणलेले विविध आयाम यांचा विशेष विचार करायला हवा.