पुणे : भगवान श्रीकृष्णाचे वाद्य असलेली बासरी आणि व्हायोलिन वादन करणाऱ्या युवा कलाकारांच्या जुगलबंदीने ‘ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सवा’ची गुरुवारी नांदी झाली. पं. व्यंकटेश कुमार यांच्या रससिद्ध गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.
सृजन फाऊंडेशन आणि नांदेड सिटीच्या वतीने आयोजित ‘ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सवा’मध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार आणि डाॅ. सुनील काळे यांच्या हस्ते प्रसिद्ध निवेदिका मंगला खाडिलकर यांना प्रकाश पायगुडे स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. शास्त्रीय संगीताचे पूर्णवेळ शिक्षण घेणाऱ्या आकाश नाईक आणि स्वप्नील सूर्यवंशी या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. ज्योत्स्ना भोळे यांच्या कन्या वंदना खांडेकर, प्रसिद्ध गायक शौनक अभिषेकी आणि फाऊंडेशनचे अध्यक्ष अधिश पायगुडे या वेळी उपस्थित होते.
फर्ग्युसन महाविद्यालयाच्या शताब्दी महोत्सवासाठी १९८५ मध्ये पुण्यात आलेल्या नरसिंह राव यांनी ‘ज्योत्स्ना भोळे यांना भेटता येईल का?’ असे मला विचारले होते. त्यावेळी ज्योत्स्ना भोळे यांना तुम्ही कसे ओळखता? असे मी राव यांना विचारले होते. ‘निजामाने हद्दपार केल्यानंतर मी पुण्यात शिकायला आलो. त्या काळी महिन्याला तीन रुपये खर्चासाठी यायचे. जेवण, शिक्षणासाठी होणाऱ्या खर्चात बचत करून ज्योत्स्ना भोळे यांची संगीत नाटके पाहायचो,’ असे राव यांनी सांगितले होते, अशी आठवण उल्हास पवार यांनी सांगितली.
खाडिलकर म्हणाल्या, ‘निवेदनाच्या क्षेत्रातील प्रवासामध्ये अनेक कलाकारांचा सहवास आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. पं. जितेंद्र अभिषेकी यांनी माझ्या निवेदनाला दिलेली दाद मोलाची होती. प्रामाणिक कार्यकर्ता, रसिक आयोजक, जाणकार क्रीडा समीक्षक, सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्त्व प्रकाश पायगुडे यांच्या नावाचा पुरस्कार माझ्यासाठी महत्त्वाचा आहे.’
अधिश पायगुडे यांनी प्रास्ताविक केले. रत्ना दहिवेलकर यांनी सूत्रसंचालन केले.