पुणे : राज्यातील वाढत्या गुन्हेगारीचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याच्या तयारीत असलेल्या युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची पोलिसांनी सोमवारी धरपकड केली. या पदाधिकाऱ्यांना समज देऊन सायंकाळी सोडण्यात आले.

राज्यातील वाढत्या गुन्हेगारीचा निषेध करण्यासाठी युवक काँग्रेसने दुचाकी फेरीची परवानगी पोलिसांकडे मागितली होती. पोलिसांनी परवानगीही दिली होती. मात्र दुचाकीवरून भाजप कार्यालयाकडे जाण्याचा आणि तेथे आंदोलन करण्याचा निर्णय पदाधिकाऱ्यांनी घेतला. त्याची माहिती पोलिसांना लागल्याने पोलिसांनी काँग्रेस भवनातच पदाधिकाऱ्यांना स्थानबद्ध केले आणि दुचाकी फेरीची परवानगीही पोलिसांनी ऐनवेळी नाकारली. त्यामुळे संतप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी दुचाकीद्वारे बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे काँग्रेस भवनात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

हेही वाचा – पुणे : नदीपात्रात घोंघावणारे कीटक नेमके कोणते? महापालिकेकडे माहितीच नाही; आरोग्य विभागाला नमुने घेण्याचाही विसर

राज्य सरकार फक्त फोडाफोडीचे राजकारण करत आहे. राज्यातील प्रश्नांचे त्यांना काही देणेघेणे नाही. कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न राज्यात निर्माण झाला आहे, असे युवक काँग्रेसचे राज्य प्रभारी उदयभानू चिब यांनी सांगितले.

राज्यात वाढत असलेली गुन्हेगारी, पोलिसांवर दिवसाढवळ्या हात उगारणारे भाजपचे नेते, यांच्यावर सरकारचं नियंत्रण नाही, तलाठी भरती घोटाळा असेल किंवा वेगवेगळ्या भरतीतला घोटाळा असेल त्या बाबतीत सरकार पावले उचलण्यात अपयशी ठरल्याचा आरोप अक्षय जैन यांनी केला.

हेही वाचा – पिंपरी : तरुणाने रचला स्वत:च्याच अपहरणाचा बनाव, पोलिसांनी तासाभरात लावला छडा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी चिब, जैन, सहप्रभारी एहसान खान, रोहन सुरवसे, तारीक बागवान, शहराध्यक्ष राहुल शिरसाट आणि प्रथमेश अबनावे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेत त्यांना समज दिली.