संक्रातीच्या सणाला तीळ आणि गुळाचे लाडू किंवा वड्या आवर्जून खाल्या जातात. तीळ हे उष्ण आणि स्निग्ध असतात जे थंडीच्या दिवसात शरीराला उष्णता आणि स्निग्धतेची पूर्तता करतात. तसेच गुळातही उष्णता असल्याने थंडीच्या दिवसात आवर्जून सेवन केले जाते. कोणी तीळ गुळाच्या वड्या करतात तर कोणी तीळ गुळाची पोळी तयार करते. तीळ गुळाची खमंग खुसखुशीत पोळी कशी तयार करावी जाणून घेऊ या…

तीळ-गुळाची पोळी

साहित्य

१ कप तीळ
पाव कप शेंगदाणे
एक कप गूळ
पाव कप बेसन
वेलची पावडर एक चमचा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कृती

  • प्रथम एक कप तीळ चांगले भाजून बाजूला काढून ठेवा.
  • त्यानंतर गरम तव्यात शेंगदाणे भाजून घ्या. थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.
  • गरम तव्यात पाव कप बेसन भाजून घ्या
  • तीळ आणि शेंगदाणे थंड झाले की मिक्सरमध्ये वाटून घ्या.
  • आता एका भांड्यात वाटलेले तीळ आणि शेंगदाणे टाका आणि त्यात एक कप किसलेला गूळ घाला आणि सर्व मिश्रण एकजीव करून घ्या आणि पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून घ्या.
  • त्यात वेलची पावडर आणि भाजलेले बेसन पीठ टाकून एकत्र करून घ्या. आता सारण तयार आहे.
  • आता पोळीसाठी कणीक भिजवा. त्यासाठी एका परातीमध्ये २ कप गव्हाचे पीठ घ्या आणि त्यात २ चमचे बेसन टाका, एक चमचा मीठ टाका आणि तेल आणि पाणी टाकून कणीक मळून घ्या. १० मिनिटे पीठ बाजूला ठेवा.
  • १० मिनिटांनंतर पीठाचे गोळे करून घ्या. त्यात तयार सारण भरून व्यवस्थित बंद करा आणि पोळी लाटून घ्या.
  • गरम तव्यावर पोळी चांगली खरपूस भाजून घ्या आणि त्याला तूप लावा.

गरमा गरम तिळाची पोळी तयार आहे.