06 August 2020

News Flash

संख्या आणि मूल्य

चलनवाढ होऊ नये म्हणून एकूण बिटकॉइनची अंतिम मर्यादा ही २.१ कोटी इतकी ठेवली आहे

संग्रहित छायाचित्र

 

गौरव सोमवंशी

‘नॉन्स नंबर’ शोधून काढणाऱ्यांना बक्षीस म्हणून देण्यासाठी केवळ २.१ कोटी इतक्याच बिटकॉइनची तरतूद का? हे बिटकॉइन सन २१४० मध्येच कसे संपतील? या प्रश्नांच्या उत्तरादाखल- ‘भविष्याबद्दल भाकीत करणे अशक्यच, पण एक ‘अभ्यासपूर्ण अंदाज’ मात्र वर्तवता येईल,’ असे बिटकॉइनचा निर्मिक सातोशी नाकामोटोने का म्हटले असावे?

मागील लेखावर (‘बिटकॉइनची बक्षिसी..’, २५ जून) वाचकांकडून ईमेलद्वारे अनेक प्रश्न आले; त्यांपैकी मुख्य प्रश्न साधारण असे होते : ‘नॉन्स नंबर’ शोधून काढणाऱ्यांना बक्षीस म्हणून देण्यासाठी फक्त २.१ कोटी इतक्याच बिटकॉइनची तरतूद का? तो आकडा ९९ कोटी किंवा एक कोटी का नाही? नेमके इतकेच बिटकॉइन गणिताच्या खाणीत आहेत हे कसे कळेल? महत्त्वाचे म्हणजे हे बिटकॉइन सन २१४० मध्ये कसे काय संपतील? जर २००९ ते २०२० या कालावधीत २.१ कोटींपैकी पैकी १.८ कोटी बिटकॉइन गणिताच्या खाणीतून खणून झाले आहेत, तर उरलेले केवळ ३० लाख बिटकॉइन खणून काढण्यासाठी आणखी १२० वर्षे का लागतील?

तर.. सर्वात आधी २.१ कोटी हा आकडा कसा आला, हे पाहू. याबद्दल सातोशी नाकामोटोने काही विधान केले आहे का? सातोशी नाकामोटो हा इसम किंवा काही इसमांचा गट, इतर लोकांच्या संपर्कात अगोदरपासून होताच. आपली खरी ओळख लपवून सातोशी नाकामोटो अनेक व्यक्तींशी संवाद साधत असे, त्यांची मदतसुद्धा घेत असे. यातील माइक हर्न्‍स या संगणकतज्ज्ञाच्या संपर्कात सातोशी नाकामोटो अनेक वर्षे होता. १२ एप्रिल २००९ रोजीच्या ईमेलमध्ये सातोशी नाकामोटो हा माइक हर्न्‍स यांना याबद्दल असे सांगतो की, ‘बिटकॉइनचा आकडा मर्यादित तर असायलाच हवा, कारण तसे न केल्यास चलनवाढ होतच राहील.’ परंतु ‘मर्यादित’ ठेवायचा, तर तो किती असावा? यावर सातोशी नाकामोटो म्हणतो की, ‘भविष्याबद्दल काहीही भाकीत करणे अशक्यच आहे, पण एक ‘अभ्यासपूर्ण अंदाज’ वर्तवता येईल.’ नाकामोटोने ‘अभ्यासपूर्ण अंदाज’व्यतिरिक्त दुसरे काहीही म्हटलेले नाही! मात्र त्यावर अनेकांनी अभ्यास करून अंदाज बांधायचे प्रयत्न केले आहेत. बरे, सातोशी नाकामोटोने म्हटले म्हणून ते बिटकॉइन फक्त २.१ कोटीच राहतील का? वाढूच शकणार नाहीत का?

आता आपण सन २१४० कडे जाऊ. कशावरून आपण हे भाकीत करतोय की, त्या वर्षीपर्यंत सारे २.१ कोटी बिटकॉइन खणून होतील? तर.. अंतिम मर्यादा २.१ कोटीच असेल असे एकदा ठरले, की मग हे समजून घेणे थोडे सोपे आहे. मागील लेखात आपण ‘बिटकॉइनच्या बक्षिसी’ची चर्चा केली; पण ‘नॉन्स नंबर’ शोधून एका ‘ब्लॉक’ला पूर्णत्व देऊन ‘ब्लॉकचेन’मध्ये जोडले की जी बक्षिसी मिळते, ती नक्की किती असते? याचे उत्तर : ही बक्षिसी बदलत राहते! आणखी सविस्तर सांगायचे, तर दर चार वर्षांनी ही बक्षिसी अर्धी होत राहते. सातोशी नाकामोटोने जेव्हा ३ जानेवारी २००९ रोजी बिटकॉइनची सुरुवात केली तेव्हा प्रत्येक वेळी ५० बिटकॉइन मिळायचे. तेव्हाच अशी तरतूद करण्यात आली होती की, प्रत्येक चार वर्षांनी ही बक्षिसी अर्धी होत राहील. २०१२ साली ती अर्धी होऊन २५ बिटकॉइन प्रति ब्लॉक इतकी झाली. २०१६ मध्ये १२.५ आणि अलीकडेच म्हणजे ११ मे २०२० पासून ती बक्षिसी ६.२५ बिटकॉइन इतकी झाली आहे. हीच बक्षिसी २०२४ मध्ये ३.१२५ बिटकॉइन प्रति ब्लॉक इतकी होईल. त्यामुळे अगोदरच्या वर्षांत अधिक बिटकॉइन ‘माइन’ किंवा खणून झाले, आणि इतर बिटकॉइन ‘माइन’ होण्यासाठी आणखी १२० वर्षे लागतील. इथे हे लक्षात असू द्या की, बिटकॉइनची संख्या कमी होत असली, तरी त्यांचे मूल्य हे बाह्य़ बाजारपेठेवर अवलंबून आहे. म्हणजे, २००९ मध्ये ५० बिटकॉइनची किंमत ही आजच्या ६.२५ बिटकॉइनपेक्षा अनेक पटींनी कमी आहे. इथे आपण बिटकॉइनचे मूल्य किती यावर लक्ष न देता, नक्की किती बिटकॉइन मिळतात हे पाहात आहोत.

परंतु ‘२.१ कोटी बिटकॉइन हे सन २१४० मध्ये संपतील’ हे गणित कसे आले? तर सरासरी १० मिनिटांनी एक ‘ब्लॉक’ बनतो. म्हणजे तासाला सहा ब्लॉक बनतील. मागील लेखात पाहिल्याप्रमाणे, जर संगणकांची क्षमता जास्तच वाढली आणि प्रत्येक वेळी दहा मिनिटांच्या आत तो ‘नॉन्स नंबर’ मिळू लागला, तर बिटकॉइन प्रणाली स्वत:हून ‘नॉन्स नंबर’ शोधण्याची स्पर्धा आणखी कठीण करते (जसे की, ‘नॉन्स नंबर’ जोडून मिळणाऱ्या ‘हॅश आऊटपूट’च्या प्रारंभी अधिक शून्यांची मागणी करून). या प्रणालीमुळे ‘ब्लॉक टाइम’ सरासरी १० मिनिटांचाच, म्हणजे तासाला सहाच राहातो. या गणिताने २४ तासांत किती ब्लॉक बनतील, तर २४ गुणिले ६.. याच सूत्राने वर्षभरात, दशकात बनणाऱ्या ‘ब्लॉक’ची संख्या काढता येईल. तसेच बक्षिसी दर चार वर्षांनी अर्धी होत राहणार, हे ध्यानात घेता प्रत्येक वेळेस हरेक ‘ब्लॉक’साठी किती बिटकॉइन बक्षिसी म्हणून मिळणार हेही कळेल. याच साध्या गणितानुसार, अंतिम मर्यादा आधीपासूनच २.१ कोटी बिटकॉइन इतकी ठेवल्यामुळे हा आकडा आपण सन २१४० मध्ये पार करू.

याचा अर्थ चलनवाढ होऊ नये म्हणून एकूण बिटकॉइनची अंतिम मर्यादा ही २.१ कोटी इतकी ठेवली आहे. पण हे सारे बिटकॉइन संपल्यानंतर मायनर मंडळींना बक्षिसीऐवजी लोकांमध्ये झालेल्या व्यवहारांचा छोटा हिस्सा हा शुल्क म्हणून मिळू लागेल.

२.१ कोटी बिटकॉइन पुरेसे आहेत असे सातोशी नाकामोटोने गृहीत धरले. पण एक गोष्ट सर्वाना आधीपासूनच माहीत आहे; ती अशी की, जे १.८ कोटी बिटकॉइन सध्या बाहेर फिरत आहेत, त्यापैकी ४० लाख बिटकॉइन हे हरवले आहेत. चोरी नाही, तर थेट हरवले आहेत आणि ते परत कधीच कोणालाही मिळणार नाहीत! हे कसे शक्य आहे? याचे कारण बिटकॉइन तंत्रज्ञान एका डिजिटल स्वाक्षरीप्रमाणे काम करणाऱ्या प्रणालीने हाताळले जाते. आपल्या ‘फेसबुक’ खात्याच्या ‘पासवर्ड’प्रमाणेच हे! परंतु जर आपण पासवर्ड विसरलो, तर फेसबुक नवीन पासवर्ड बनवण्याचे काही पर्याय आपल्याला देते. बिटकॉइन मात्र स्वत:हून असा कोणताही पर्याय देत नाही. इथे तुमच्या डिजिटल चाव्या तुमच्याकडून हरवणार नाहीत याची जबाबदारी तुम्हीच घ्यायची आहे. ज्यांच्याकडून या डिजिटल चाव्या हरवल्या आहेत, त्यांच्याकडील बिटकॉइनही नेहमीसाठी हरवले आहेत. ते इतरांना दिसतील, पण कोणीही ते वापरू शकणार नाहीत. तसेच तुम्ही जर चुकीच्या ठिकाणी बिटकॉइन पाठवले आणि तुम्हाला नंतर कळाले की तुमच्याकडून चूक झाली आहे, तर तुम्ही कोणत्या बँकेकडे जाल वा कोणाकडे दाद मागाल? बिटकॉइनच्या बाबतीत कोणतीही केंद्रीय संस्था नसल्याने दाद मागता येणार नाही. त्यामुळे असे बिटकॉइनसुद्धा ‘हरवले’ असेच म्हणावे लागेल. म्हणजे जगात १.८ बिटकॉइन या क्षणी असतील आणि सन २१४० पर्यंत एकूण २.१ कोटी बिटकॉइन होणार असतील, तरीसुद्धा त्यापैकी अनेक बिटकॉइन हे नेहमीसाठी हरवलेले असतील.

सुरुवातीला माइक हर्न्‍स या संगणकतज्ज्ञाचा उल्लेख आला आहे. हर्न्‍स हे अशी व्यक्ती होते, ज्यांच्यासोबत सातोशी नाकामोटोने शेवटचा ज्ञात संवाद साधला होता. २३ एप्रिल २०११ रोजी सातोशी नाकामोटोने हर्न्‍स यांना असे सांगितले की, ‘मला आता बिटकॉइनवर काम करणाऱ्या तज्ज्ञांवर विश्वास आहे. मी आता दुसरे काही काम हाती घेतले आहे आणि माझे लक्ष पूर्णपणे त्याकडेच वळवले आहे.’’ या संवादानंतर सातोशी नाकामोटोने कधीच कोणाशी व्यक्तिश: कोणताही संवाद साधलेला नाही. तसेच नाकामोटोने स्वत:च्या खात्यात असलेले बिटकॉइन कधीच वापरले नाहीत किंवा कोणत्याही इतर चलनासोबत विनिमय करण्याचा प्रयत्नही केला नाही. गोष्ट इथे संपत नाही. माइक हर्न्‍स यांनी स्वत:हून बिटकॉइनसाठी काम केले; पण २०१६ मध्ये त्यांनी आपल्याकडे असलेले सर्व बिटकॉइन विकून ते बिटकॉइनपासून नेहमीसाठी दूर जात असल्याचे जाहीर केले. याचे कारण त्यांनी बिटकॉइनबाबत सुचवलेले बदल अमलात आले नाहीत.

माइक हर्न्‍स यांनी सुचवलेले बदल अमलात आणू शकता आले असते का? नाकामोटोने तरतूद करून ठेवली आहे म्हणून साऱ्या गोष्टी तशाच राहतील का? कोणास वाटले की बिटकॉइनचा आकडा २.१ कोटी नसून आणखी एक कोटीने वाढवायला हवा, तर करता येईल का? नाकामोटोने त्याच्या निर्णयोत्तरही हवे तसे बदल काळानुरूप करता यावेत यासाठीसुद्धा काही तरतूद केली आहे का? या प्रश्नांची उत्तरे पुढील लेखात पाहू या..

लेखक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या उपयोजन क्षेत्रात कार्यरत आहेत. ईमेल : gaurav@emertech.io

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 12:09 am

Web Title: article on bitcoin number and value abn 97
Next Stories
1 बिटकॉइनची बक्षिसी..
2 ब्लॉक ते ब्लॉकचेन
3 चार शून्य.. बिटकॉइन!
Just Now!
X