15 July 2020

News Flash

विचारक्रांतीचे स्फुल्लिंग

वर्गीय प्रतिष्ठेचा लाभ होण्याऐवजी जातीय हीनत्वाचा अपमान त्यांना पदरी घ्यावा लागत होता.

संग्रहित छायाचित्र

 

उमेश बगाडे

महात्मा फुले यांनी अनुभववादी ज्ञानमीमांसेला उचलून धरले; जातीच्या गुलामीची व्याख्या केली आणि जातिव्यवस्थेविरोधातल्या भौतिक लढय़ाला गती दिली.

त्यांनी घडवलेला वैचारिक बदल अनेकांगी होता..

एकोणिसाव्या शतकात मध्यमवर्गीय नोकऱ्या व व्यवसायांच्या क्षेत्रात शिरण्यासाठी शूद्रातिशूद्र जातींतील नवशिक्षितांना ब्राह्मण वर्चस्वाशी झुंजावे लागत होते. नोकरी-व्यवसायात स्थिरावल्यावरही त्यांचा संघर्ष संपत नव्हता. मध्यमवर्गातील ब्राह्मणबहुलतेतून संचारित झालेल्या जातीश्रेष्ठत्वाचा त्यांना सामना करावा लागत होता. वर्गीय प्रतिष्ठेचा लाभ होण्याऐवजी जातीय हीनत्वाचा अपमान त्यांना पदरी घ्यावा लागत होता. त्यातून त्यांची ब्राह्मणवर्चस्वविरोधाची आत्मस्थिती घडत होती. तिला महात्मा जोतीराव फुले यांनी जातीउच्छेदाच्या तत्त्वज्ञानाची जोड दिली.

समकालीन इंग्रजी शिक्षित बुद्धिजीवींप्रमाणेच वासाहतिक ज्ञानमीमांसेने जोतीराव प्रभावित झाले होते. इतर सहकाऱ्यांप्रमाणेच त्यांनी प्रबोधन युगाने घडवलेल्या आधुनिक विचारपद्धतीचा अंगीकार केला होता. थॉमस पेनच्या बंडखोर धर्मविचारांना त्यांनी आत्मीय मानले होते. पण तरीही त्यांच्या विचारांची वाट इतरांपेक्षा वेगळी राहिली.

इंग्रजी शिक्षित बुद्धिजीवींनीही पत्करलेले जातीवारशाचे जडत्व जोतीरावांनी मुळापासून धुडकावून लावले. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातली बंडखोरी त्यांनी अंगीकारलीच, पण भारतात जातीविद्रोहाची विचारपरंपराही आत्मसात केली. धर्म, समाज, संस्कृती यांच्या चिकित्सेची एक खास पद्धती त्यांनी विकसित केली. त्यामुळे त्यांच्या तत्त्वज्ञानाला क्रांतिकारक परिमाण प्राप्त झाले. बाह्य़ विश्वाकडे आणि आत्मस्थितीकडे बघण्याची संकल्पनात्मक चौकट बदलणारा प्रमाणशास्त्रीय खंड (एपिस्टेमॉलॉजिकल ब्रेक) त्यांच्या विचारातून प्रगट झाला.

अनुभववादी तर्कप्रामाण्य

जोतीरावांनी ज्ञानविधान करण्याचे तीन प्रचलित प्रकारचे तर्क सांगितले आहेत. कर्ता व कर्म यांच्या प्रत्यक्ष संबंधावरून ज्ञानविधान करणारा पहिल्या प्रकारचा ‘प्रत्यक्षाधिष्ठित तर्क’ आणि पदार्थ व त्याचे लक्षण, गुणधर्म, परिणाम यांच्यातील अंतर्निहित संबंधांवरून ज्ञानविधान करणारा अनुमानाचा दुसऱ्या प्रकारचा तर्क. ज्ञानसिद्धी करणारे तर्क म्हणून जोतीरावांनी त्यांचा स्वीकार केला आहे.

मात्र भावनेचे तरंग म्हणून व्याख्यांकित केलेला काल्पनिकतेवर बेतलेल्या अनुमानाचा तिसरा तर्क त्यांनी नाकारला. या तर्काचे उदाहरण म्हणून ‘आत्मा’ या कल्पनेची चर्चा त्यांनी केली. आत्मा हा चिरंतन व नष्ट न होणारा असतो हे कल्पनारचित आहे, असे सांगून त्यांनी त्याला धुडकावून लावले. आत्म्यावर उभी राहिलेली कर्मसिद्धांत, पुनर्जन्म अशी कल्पनेची पिलावळ त्यांनी नाकारली. ‘शरीराशिवाय आत्मा कुणी पाहिला आहे का?’ असा बौद्ध परंपरेतून आलेला प्रश्न त्यांनी विचारला. नशीब, दैव, प्रारब्ध, संचित, स्वर्ग, नरक, पाप, पुण्य अशी सर्व धार्मिक कल्पिते भावतरंग म्हणून त्यांनी नाकारली.

जोतीरावांच्या या अनुभववादी ज्ञानविषयक भूमिकेमुळे प्रमाणशास्त्रीय खंड उभा राहिला. जोतीरावांपूर्वी स्वत:च्या दास्याचे दु:ख स्त्री-शूद्रातिशूद्रांना खचितच वाटत असे. संतांच्या आत्मपर अभंगांतून ते प्रगटही होत असे. पण स्व-दु:खाचे कारण धर्माने रचलेल्या कल्पनेच्या जंजाळात ते शोधत असत. मागील जन्मात केलेल्या कृष्णनिंदेमुळे महार जन्म प्राप्त झाल्याची बोच संत चोखामेळा त्यामुळेच बोलून दाखवतात. कल्पनेच्या, भावतरंगाच्या रूपातल्या तर्काचा हा प्रकार नाकारून जोतीरावांनी अनुभववादी ज्ञानमीमांसेला उचलून धरले. त्यामुळे स्त्री-शूद्रातिशूद्रांच्या दु:खाची, दास्याची वास्तविक कारणमीमांसा करण्याचा मार्ग खुला झाला.

जातीचिकित्सा

मानवी हक्काच्या विचाराला जोतीरावांच्या तत्त्वज्ञानात मध्यवर्ती स्थान प्राप्त झाले. युरोपच्या प्रबोधन चळवळीने स्वातंत्र्य, समता व बंधुतेची घोषणा केली; स्वातंत्र्य हे मनुष्यपणाचे अंगभूत लक्षण मानले आणि सर्व प्रकारच्या गुलामीला अमानुष मानणारी चळवळ उभारली. तिच्या प्रभावातून ब्राह्मण व तत्सम जातींतील बुद्धिजीवींनी वासाहतिक पारतंत्र्याला गुलामी मानून राष्ट्रीय स्वातंत्र्याची चळवळ सुरू केली, तर जोतीरावांनी शूद्र कल्पनेच्या आधारे उभे राहिलेले स्त्री-शूद्रातिशूद्रांचे दास्य अधोरेखित करून सामाजिक मुक्तीची चळवळ उभी केली.

जोतीरावांनी जातीची गुलामगिरी व्याख्यांकित करून तिच्या अंगोपांगांची उकल केली. धर्माच्या सामाजिक-सांस्कृतिक यंत्रणेच्या मुशीत घडलेल्या जातीच्या सत्तासंबंधांचा आणि त्यातील शोषणप्रक्रियेचा उलगडा केला. जाती-जातींमधील श्रेष्ठ-कनिष्ठतेचा, वर्चस्व-अंकिततेचा, स्वामी-सेवकत्वाचा सत्तासंबंध जातीच्या विनिमय संबंधांचा आधार बनून शोषणप्रक्रियेला गतिमान करतो; अशुद्धी, कनिष्ठता, अधिकारविहीनता, अवलंबित्व आणि दास्य लादून शूद्रातिशूद्र जातींची लूट करतो- हे जोतीरावांनी स्पष्ट केले. जातिव्यवस्थाक शोषणात धर्मसंस्था व राज्यसंस्था कळीची भूमिका बजावतात त्या कशा, हेही उघड केले. जाती-शोषणतंत्राच्या अनेक पैलूंची अशी  मूलगामी उकल करून जातिव्यवस्थेविरोधातल्या भौतिक लढय़ाला जोतीरावांनी गती दिली.

जोतीरावांनी धार्मिक विचार व संस्कृती व्यवहाराच्या पाशात घडलेल्या शूद्रातिशूद्रांच्या जातीय गुलामीचे विवेचन केले. जातीय गुलामीचे वर्णन- ‘ब्राह्मणवादाने घडवलेले बद्धतेचे जाळे’ असे जोतीरावांनी केले. धार्मिक विचारांच्या जाळ्यात अडकलेले शूद्रातिशूद्र स्वसमर्पित गुलाम बनतात. त्याची स्थिती सर्पाच्या विळख्यात अडकल्यासारखी असते. ती त्यांना सत्त्वहीन करून मानसिकदृष्टय़ा अशी जखडून टाकते की प्रतिकार करणे अशक्य होते. या पार्श्वभूमीवर जातीदास्यातून मुक्ती मिळवण्यासाठीचा संघर्ष जोतीरावांनी पुरस्कारला. दास्यमुक्तीसाठी जातिव्यवस्थेच्या शोषण-शासनाचा भौतिक संबंध उखडून काढावा लागेल; जातिव्यवस्थेच्या शोषणतंत्रात उतरलेल्या धर्मविचाराचा पर्दाफाश करावा लागेल; स्त्री-शूद्रातिशूद्रांची स्वत:कडे आणि विश्वाकडे बघण्याची जाणीवही बदलावी लागेल, अशी भूमिका त्यांनी घेतली.

‘सत्वा’चा इतिहासविचार

जोतीरावांनी सत्ता आणि ज्ञान यांच्यातील संबंध ओळखला होता. अविद्येचा म्हणजे भ्रांत ज्ञानाचा अंमल तयार करून ब्राह्मणांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले, असा त्यांचा दावा होता. भ्रांत ज्ञानाच्या आधारावरच शुद्ध-अशुद्ध, श्रेष्ठ-कनिष्ठ, स्वामी-सेवक अशी जातीच्या श्रेणीबद्धतेची जी कल्पना उभारण्यात आली होती, तिच्या आधारानेच जाती अस्मितांची धारणा केली जात होती. विशेषत: पुराणकथांच्या पसाऱ्यामधून इतिहास व परंपरेचे भान प्रसृत करून शूद्रातिशूद्र जातींना अंकित, अपमानित स्वत्वाच्या कोशात उभे केले जात होते. त्यामुळे पुराणकथांवर व त्यातून येणाऱ्या जातीविषयक धारणांवर जोतीरावांनी संहारक हल्ला चढवला.

पुराणादी वाङ्मयाने रचलेल्या जातीउतरंडीला व तिने लादलेल्या जातीय हीनतेला निम्न जातींनी सर्वकाळ मान्य केले असे घडले नाही. त्यांनी स्वजातीच्या स्वायत्त अवकाशात जातीउतरंडीच्या कल्पनेला उलटे केले. स्वजातीच्या उत्पत्तीची पुराणकथा रचून स्वजातीची प्रतिष्ठा उभी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जातीय सत्त्वाची अशी पुनर्माडणी करताना जातीच्या शुद्धी-अशुद्धीला त्यांनी स्वीकारले. पुराणकथा गतकाळाला दैवी कृतीचे क्षेत्र मानून जातीला अटळ व अपरिवर्तनीय ठरवते. याउलट इतिहास गतकाळाला मानवी कृतीचे क्षेत्र मानून जातिव्यवस्थेला परिवर्तनीय बनवते. या पार्श्वभूमीवर जातीच्या अस्तित्वकल्पनांचा शोध इतिहासाच्या प्रांगणात घेऊन जाण्याची भूमिका जोतीरावांनी घेतली.

शूद्रातिशूद्रांच्या इतिहास लेखनासाठी नवी इतिहासकल्पना जोतीरावांनी घडवली. पुराणकथा, परंपरा व व्युत्पत्ती यांच्या अन्वयार्थातून इतिहासाची तथ्ये गोळा करण्याची रीत त्यांनी विको या (तोवर इंग्रजीत पोहोचलेल्या) इटालियन अभ्यासकाकडून घेतली. आर्य-अनार्य संघर्षांच्या प्रमेयाआधारे भारतीय इतिहासाची संगती मांडली. जातिव्यवस्था व अस्पृश्यता आर्य-अनार्य संघर्षांचे फलित असल्याचा निष्कर्ष मांडला. उत्क्रांतीवादाच्या चौकटीत इतिहासाच्या बदलांना समजून घेण्याची भूमिका घेतली. हिंसा व विचारसरणी इतिहासाच्या प्रेरक शक्ती असल्याचे मत मांडले.

भारताचा इतिहास हा जातीसंघर्षांचा इतिहास असल्याचे सूत्र जोतीरावांनी प्रतिपादले. जातीसंघर्षांच्या परंपरेत शूद्रातिशूद्रांच्या अस्मितेचा शोध त्यांनी घेतला. बळीच्या राज्यात स्वातंत्र्य, समता, बंधुता, प्रजासत्ताकता, उद्योगीपणा, कलासक्ती आदी मूल्यांचा आदर्श त्यांनी स्थापन केला. गौतम बुद्ध, बृहस्पती, तुकाराम महाराज यांच्या जातिव्यवस्थाविरोधी कार्यकर्तृत्वाचा गौरव करून त्याला शूद्रातिशूद्र जातींच्या आत्मतत्त्वाचा भाग केले. जोतीरावांच्या या इतिहासविचाराने शूद्रातिशूद्रांची आत्मस्थितीकडे बघण्याची नजर बदलली. त्यांच्या मनात जातीदास्याच्या अपमानाची बोच व स्वातंत्र्याची आस जागवली गेली. जातीवर्चस्वाशी व अन्यायाशी ईर्षेने लढणारे व मानवी हक्काच्या प्राप्तीसाठी झटणारे बंडखोर आत्मभान त्यातून प्रवाहित झाले.

पर्यायाचा विचार

विश्वधर्माची भूमिका घेणारा सार्वजनिक सत्यधर्माचा सांस्कृतिक पर्याय जोतीरावांनी उभा केला. त्यांनी मानवी समता व बंधुतेला आधारभूत होणारा ईश्वरविचार मांडला. स्त्रीशूद्रातिशूद्रांच्या शासन-शोषणाला नाकारण्याची पूर्वअट ठेवणारा सत्यवर्तनाचा विचार सांगितला. स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही या मूल्यांचा उद्घोष करणारा नीतीविचार मांडला. लग्न, बारसे, अंत्यविधी असे पर्यायी विधी रचताना खंडोबा, भैरोबा अशा शूद्रातिशूद्र इतिहास नायकांची स्मृती जागवली; परोपकार व सद्गुणसाधनेचा विचार त्यात गोवला.

सार्वजनिक सत्यधर्माच्या या छत्राखाली शूद्रातिशूद्रांची दास्यत्वभावी आत्मस्थिती बदलण्याचा संघर्ष गतिमान झाला; पण शूद्रातिशूद्र नवशिक्षितांना वर्गीय कृतिशीलतेचा अवकाशही त्यातून प्राप्त झाला. सत्याचा व विवेकनिष्ठेचा प्रसार करणे, स्त्रिया व शूद्रातिशूद्रांमध्ये शिक्षणप्रसार करणे, शेतीच्या आधुनिक तंत्राचे ज्ञान सर्वदूर पोहोचवणे, सामाजिक दुष्प्रथांचा नायनाट करणे.. अशा अनेक कामांत त्यांनी स्वत:ला झोकून दिले.

लेखक ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा’त इतिहासाचे प्राध्यापक आहेत. ईमेल : ubagade@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2020 12:03 am

Web Title: article on spark of thought revolution abn 97
Next Stories
1 शूद्रातिशूद्रांमधील नवशिक्षितांचा उदय
2 अद्भुतकथनाचे तंत्र
3 स्त्रीप्रश्नाच्या चर्चेची सुरुवात..
Just Now!
X