20 November 2017

News Flash

बाबुराव हरवले आहेत..!

‘जगातले टिकून राहिलेले साहित्य हे व्यवस्थेशी झोंबी घेणारे असते’, असे अध्यक्षीय भाषणात म्हणायचे आणि

मुंबई | Updated: January 12, 2013 1:00 AM

‘जगातले टिकून राहिलेले साहित्य हे व्यवस्थेशी झोंबी घेणारे असते’, असे अध्यक्षीय भाषणात म्हणायचे आणि प्रत्यक्षात त्याच व्यवस्थेचा भाग होण्याकडेच लक्ष ठेवून जगायचे आणि आपले साहित्य बेतायचे, हे कसे काय?
‘प्रस्थापित व्यवस्थेशी जे साहित्य संघर्ष मांडते तेच साहित्य संस्कृती समृद्धीच्या दृष्टीने मोलाचे असते’ आणि ‘व्यवस्थेशी संघर्ष करणाऱ्या लेखकाच्या भूमिका समाजाला पुढे नेणाऱ्या असतात’ असे शूर प्रतिपादन चिपळूण येथे भरलेल्या अ. भा. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले आहे. परंतु साहित्य संमेलन असो वा समाजाला छळणारे अन्य काही, यातील कोणत्या प्रश्नावर कोत्तापल्ले  यांनी कोणती भूमिका कधी घेतली आहे? साहित्य संमेलनांच्या पाश्र्वभूमीवर वाद होणे हे जरी नवे नसले तरी या संदर्भात चिपळुणात जे काही झाले ते मराठी सारस्वतासाठी लाजिरवाणेच होते. ‘भूमिकेशिवाय साहित्य दोर कापलेल्या पतंगासारखे असते,’ असेही संमेलनाध्यक्ष म्हणतात. तेव्हा त्यांच्या मताप्रमाणे भूमिका घेणे हा निकष लावायचा झाल्यास साहित्य संमेलनाचा मंडप ओस पडेल आणि तेथे फक्त राजकीय पक्षांचे कार्यकर्तेच राहतील अशी परिस्थिती आहे, हे ते मान्य करणार आहेत का? यंदाच्या साहित्य संमेलनात साहित्य आणि साहित्यिक कमी आणि राजकारणी जास्त असेच चित्र आहे. ते साहित्यिक मंडळी प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात भूमिका घेतात म्हणून तयार झाले आहे, असे म्हणायचे काय? ज्या साहित्यिकांनी व्यवस्थेच्या विरोधात भूमिका घेऊन साहित्य आणि जीवन हे पुढे न्यायला हवे असे कोत्तापल्ले यांना वाटते ती साहित्यिक मंडळी ही अशी प्रस्थापित व्यवस्थेचाच भाग बनून ढेकर देताना दिसत असतील तर त्या साहित्य विश्वास काय म्हणावे? चिपळूणचे साहित्य संमेलन हे राजकीय पक्षांनी पळवून नेले आहे अशी टीका जेव्हा होत होती तेव्हा स्वत: संमेलनाध्यक्षांनी व्यवस्थेच्या विरोधात कोणती भूमिका घेतली? उलट राजकारण हे जगण्याचा भागच आहे तेव्हा राजकारण्यांनी साहित्य संमेलनास येण्यास विरोध का करायचा, असाच प्रश्न कोत्तापल्ले यांनी उपस्थित केला. ते त्यांचे मत आहे आणि तसे ते असण्याचा त्यांना अधिकारच आहे, याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. परंतु ‘जगातले टिकून राहिलेले साहित्य हे व्यवस्थेशी झोंबी घेणारे असते’, असे अध्यक्षीय भाषणात म्हणायचे आणि प्रत्यक्षात त्याच व्यवस्थेचा भाग होण्याकडेच लक्ष ठेवून जगायचे आणि आपले साहित्य बेतायचे, हे कसे काय? यातील दुटप्पीपणा कोत्तापल्ले यांना दिसत नाही काय? झोंबी हा शब्द कोत्तापल्ले यांच्या भाषणात अनेक ठिकाणी आला आहे. प्रस्थापित व्यवस्थेस आव्हान देण्याचे त्यांचे आकर्षण त्यातून दिसते. परंतु अशी झोंबी त्यांनी घेतल्याची उदाहरणे नाहीत. हे विधान अर्थातच अनेक साहित्यिकांना लागू पडते. ‘झोंबी’ लिहिणारे आनंद यादव यांच्यासारखे साहित्यिक जर धमकीस घाबरून आपले पुस्तकच्या पुस्तक मागे घेणार असतील तर अशा साहित्यिकांकडून कोणत्या आव्हानाची अपेक्षा वाचकांनी करायची? ‘संघर्ष म्हणजे केवळ शब्दांचे बुडबुडे उडवणे नव्हे तर ठोसपणे जातिव्यवस्थेशी टक्कर घेणे’ असे कोत्तापल्ले दलित साहित्यासंदर्भात आपल्या अध्यक्षीय भाषणात नमूद करतात. परंतु त्यांना अभिप्रेत असलेले दलित साहित्य पहिल्या लाटेतच शांत झाले. ती लाट ओसरल्यावर दलित लेखक आणि त्यांचे लेखन हे दोन्हीही प्रस्थापित व्यवस्थेत स्वत:ची पाटवाटी मांडण्याच्या घाईत दिसते याबद्दल कोत्तापल्ले गप्प कसे? तेव्हा साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून दलित लेखकांचे वाढते मध्यमवर्गीयपण दाखवून देण्याचे धैर्य त्यांनी दाखवणे गरजेचे होते. या संदर्भात गेल्याच महिन्यात पुण्यातील संमेलनात संजय पवार यांनी घेतलेली भूमिका ही जास्त प्रामाणिक म्हणायला हवी. साहित्यिकांची जमात एकूणच निवांतपणात आनंद मानू लागली असेल तर त्यात दलित साहित्यिकांना वगळून कसे चालेल? लेखनाची ठिणगी एखाद्या आत्मचरित्रात वा दोन-पाच कथांत विझवून बसलेले दलित लेखक आज कोणाच्या ना कोणाच्या आश्रितासारखेच राहत आहेत, हे कोत्तापल्ले यांना दिसत नाही असे मानायचे काय? साहित्यिकांनी आसपासच्या प्रश्नावर भूमिका घ्यायला हवी असे ते म्हणतात. परंतु ज्या कोकणात हे साहित्य संमेलन भरत आहे त्या कोकणात विशेष आर्थिक क्षेत्राच्या नावाने शेतकऱ्यांची सोन्यासारखी जमीन कवडीमोलाने उद्योगपतींच्या घशात घालण्याचा सामुदायिक प्रयत्न राजरोस सुरू आहे. कोकणाचे दुर्दैव हे की तो करणारे नेतेही स्वत:ला कोकणाचेच मानतात. अशा प्रयत्नांना विरोध करण्याचे धैर्य कोकणाबाहेरच्या किती साहित्यिकांनी दाखवले? या परिसरातल्या शेतकऱ्यांचे दु:ख समजून घेण्यासाठी मराठी सारस्वताच्या अंगणातील किती सरस्वतीपुत्रांनी कष्ट घेतले? परदेशातील साहित्य संमेलनासाठी बॅगा भरून निमंत्रणाची वाट पाहत थांबणाऱ्या किती साहित्यिकांना या परिसरास भेट देऊन जे काही चालले आहे त्याची दखल घ्यावीशी वाटली? पंजाबची समस्या ऐन भरात असताना विजय तेंडुलकर यांच्यासारख्या लेखकास प्रत्यक्ष तेथे जाऊन प्रश्न समजून घेण्याची प्रेरणा होती. त्यांचे एक सोडून देता येईल. मराठी साहित्यिकांना पंजाबला जाणे कदाचित परवडणार नाही. परंतु कोकणात जाण्याचे कष्ट घेणे तितके अवघड म्हणता येणार नाही. तशीच गरज पडली असती तर कोमसापचे समितीपुरुषोत्तम मधुभाई हे सरकारी मदत मिळवण्यासाठी मागे हटले नसते. एरवीही सरकारकडून काय कसे काढता येते याचा दांडगा अनुभव त्यांच्या गाठीशी आहेच. तेव्हा कोत्तापल्ले म्हणतात त्या प्रमाणे ‘टिकून राहणारे साहित्य वास्तवाचे झडझडून भान देणारे, जागे करणारे, नव्या मूल्यांची आणि विवेकाची लावणी करणारे असते’ हे जर खरे मानले तर हे सारे आजच्या साहित्यात कोठे मिळते याचेही दिशादर्शन संमेलनाच्या खुर्चीतून त्यांनी करणे आवश्यक होते? त्यांच्या मते साहित्याला ‘संस्कृतीच्या शुद्धीकरणात मोठे स्थान’ असते. ते खरेही आहे. पण त्यासाठी लेखक हा व्रतस्थ असावा लागतो आणि आपले साहित्य हे त्याने वसा घेतल्यासारखे प्रसवणे आवश्यक
असते. तसे साहित्य आणि साहित्यिक नागनाथ
कोतापल्ले यांना आपल्या आसपास आहेत असे वाटते काय?
मराठी साहित्याच्या प्रवाहाने आज एक वेगळे वळण घेतलेले आहे. टुकार आणि त्याच त्याच अनुभवांची उभीआडवी रांगोळी घालणाऱ्या मराठी साहित्यास आज वाचक विटलेला आहे. सध्या कोणत्या पुस्तकांना मागणी आहे याची माहिती त्यांनी प्रकाशकांकडून घेतली असती तर त्यांना हे सहज समजले असते. आपल्या दैनंदिन जगण्याचे भान आणणारे, अर्थ लावण्यास मदत करणारे साहित्य आज मोठय़ा प्रमाणावर वाचले जात आहे. तरुण मराठी वाचक हा चपटय़ा, काडेपेटीसारख्या सपाट कथाकादंबऱ्यांपेक्षा अशा लेखनाकडे मोठय़ा प्रमाणावर वळताना दिसतो. त्याचे कोणतेही प्रतिबिंब कोत्तापल्ले यांच्या अध्यक्षीय भाषणात नाही. त्याच वेळी जागतिकीकरणाच्या नावे उसासा मात्र त्यांनी
या भाषणात सोडलेला आहे. ‘जागतिकीकरणामध्ये अर्थकारण केंद्रस्थानी आल्याने स्त्रियांची गुलामी अधिक घट्ट होत आहे’, असे त्यांचे निरीक्षण आहे. ते अगदीच वरवरचे आहे. संमेलनाध्यक्षाच्या खुर्चीतून व्यक्त होणारे मत अधिक गंभीर हवे.
वस्तुस्थिती ही आहे की कोत्तापल्ले ज्या भाऊगर्दीत आहेत तेथील धनदांडग्या राजकारण्यांच्या कोलाहलात हा साहित्यिक कोपऱ्यातल्या केरसुणीसारखा आहे. संमेलनातून साहित्य आणि साहित्यिक हरवत चालला आहे. कोत्तापल्ले यांच्याच कवितेचे शीर्षक वापरावयाचे झाल्यास ‘हे साहित्यिक बाबुराव संमेलनातून हरवले आहेत’, असेच म्हणावयास हवे.

First Published on January 12, 2013 1:00 am

Web Title: baburao is missing