लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर एकेक खासदार जोडावा अशी गरज असताना मित्रपक्षांतून कोणाला कमी करणे भाजपला परवडणारे नाही. हे राज ठाकरे यांनी ओळखले आणि म्हणूनच भाजपला जाहीर पाठिंबा देऊन शिवसेनेच्या आणि भाजपच्या अडचणीत भर टाकली. न मागता दिल्या गेलेल्या या पाठिंब्यामुळे भाजपसमोर काही नाजूक प्रश्न निर्माण होतात..

राजकारणाच्या खेळात एखाद्याची अडचण त्याला हवे ते नाकारून जशी करता येते तशीच नको असेल ते देऊनही करता येते. कसे ते राज ठाकरे यांनी दाखवून दिले आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या जुन्या आणि त्यामुळे जाणत्या म्हणावयास हवे अशा आघाडीतील एकालाच राज यांनी पाठिंबा जाहीर केल्याने दुसऱ्याच्या मनात संदेह निर्माण झाला असून त्या पक्षाच्या नेत्यांनी अपेक्षेप्रमाणे चिडचिड सुरू केली आहे. राजकारणात आपली उद्विग्नता अशी जाहीरपणे दाखवायची नसते. कारण पक्ष कोणताही असो, कार्यकर्त्यांना आपला नेता हतबुद्ध झाल्याचे पाहावयास आवडत नाही. नेत्याची असहायता जाहीर दिसल्यास कार्यकर्त्यांचा नेतृत्वावरील विश्वास उडतो आणि मग हे कार्यकर्ते सैरावैरा होतात. शिवसेनेबाबत ही परिस्थिती निर्माण होताना दिसते. खरे तर शिवसेना आणि भाजप या दोन मित्रपक्षांच्या परस्पर अपरिहार्यतेमुळे तयार झालेली आघाडी लवकरच त्रिदशकपूर्ती सोहळा साजरा करेल. परंतु अजूनही दोघांत हवा तसा विश्वास नाही. जबरदस्तीने नांदावयास लागले की असे होत असावे. किंबहुना इतक्या वर्षांच्या सहवासाने उलट दोघांतील दुस्वासच वाढीस लागला आहे की काय, असा संशय यावा. याचे कारण आघाडी इतकी वर्षे बांधलेली राहिली ती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे प्रमोद महाजन यांच्या धाकामुळे. आता हे दोघेही नाहीत आणि या दोन्ही पक्षांना दरारा वाटावा असा अन्य नेता दोन्ही पक्षांत नाही. राष्ट्रीय स्तरावर सत्तेची स्वप्ने पाहणाऱ्या भाजपस एकेक खासदार जोडणे आवश्यक असल्याने त्या स्वार्थातून प्रमोद महाजन यांनी सेनाप्रमुखांच्या गळी ही आघाडी उतरवली. तोपर्यंत शिवसेनेने वेगवेगळय़ा टोकाच्या भूमिका घेऊन झाल्या होत्या. त्या संघटनेचा राजकीय आधार खरे तर गिरणी कामगार. परंतु सेनाप्रमुखांनी काही काळ ही संघटना गिरणी मालकांच्या दावणीला बांधली आणि जे काही मिळाले त्या बदल्यात डाव्यांच्या संघटना मोडून काढण्याचे पुण्यकर्म केले. सेनेने जे काही केले त्यातील विरोधाभास इतका हास्यास्पद होता की मराठीच्या मुद्दय़ाची मालकी सांगणाऱ्या या संघटनेने स्वत:च्या डोळय़ांदेखत मुंबईतील मराठी कामगार देशोधडीला लागताना निष्क्रियपणे पाहिले. ऐंशीच्या दशकात डॉ. दत्ता सामंत यांनी घडवून आणलेल्या गिरणी संपातून सेनेचे हे निष्क्रियत्व उल्लेखनीय ठरले. याचा परिणाम असा झाला की सेनेचा म्हणून जो मतदार होता तोच मुंबईतून परागंदा झाला आणि या शहरात उत्तर भारतीयांचे प्राबल्य वाढले. स्वत:च्या हातानेच स्वत:चा मतदार दूर करणारा सेनेसारखा पक्ष पाहावयास मिळणे फारच दुर्मीळ. सध्या तर परिस्थिती अशी की मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांपैकी निम्म्याहून अधिक मतदारसंघांत अमराठी अधिक आहेत. तेव्हा अशा परिस्थितीत आहे तो मराठी टक्का धरून ठेवणे सेनेसाठी गरजेचे होते. हे भाषक शहाणपण त्या पक्षाने दाखवले नाही म्हणून अन्य राज्यांत प्रादेशिक पक्ष एकेकटे सत्तेवर येत असताना सेनेस स्वत:च्या हिमतीवर या यशाच्या जवळपासही फिरकता आलेले नाही. याचा अर्थ सत्तेचे स्वप्न पाहावयाचे तर सेनेस अन्य एखाद्या भिडूची गरज आहे. ती ओळखून प्रमोद महाजन यांनी भाजपचा टेकू सेनेला देऊ केला आणि त्या बदल्यात आपल्या सांसदीय मार्गातील एक शिडी म्हणून सेनेस तयार केले. एव्हाना देशात हिंदुत्वाची हवा होती. मराठीचा मुद्दा घालवून बसलेल्या सेनेला अस्तित्वाचा नव्याने अर्थ लावण्यासाठी हे हिंदुत्व सोयीचे ठरले आणि भाजपलादेखील हिंदू म्हणवून घेणारा भिडू मिळाला. सांप्रति पंचाईत ही की भाजपचे हिंदुत्व पातळ झाले आहे आणि सेनेने तर आपले मराठीपण कधीच मागे सोडले आहे.
अशा वेळी एकटय़ाच्या बळावर सत्ता येणार नाही हे ठाऊक असताना नवे सहकारी जोडण्याचे मोठेपण या पक्षाच्या नेत्यांनी दाखवावयास हवे होते. परंतु इतकी प्रगल्भता विद्यमान सेना नेतृत्वांत नाही. वास्तव हे आहे की सेनाकार बाळासाहेब ठाकरे हे ऐन भरात असतानादेखील या पक्षास भाजपचे सहकार्य असूनसुद्धा सत्तेपासून दूर राहावे लागले होते. तेव्हा तीर्थरूपांची अनुपस्थिती भरून काढायची तर चिरंजीवांनी अधिक राजकीय चातुर्य आणि लवचीकता दाखवावयास हवी. नपेक्षा नवे सहकारी तरी जोडावयास हवेत. सेनेबाबत हे दोन्ही होताना दिसत नाही. उलट फुरंगटून बसणाऱ्या नेतृत्वामुळे भाजपचीच कुचंबणा होताना दिसते. मोदीग्रस्त भाजपस संसदेत पोहोचण्यासाठी मिळेल त्या साथीदाराची गरज आहे. त्यामुळेच या पक्षाचे नेते राज ठाकरे यांच्याकडे मागच्या दाराने जाऊन काही चोरटे संबंध प्रस्थापित करता येतील का याची चाचपणी करीत होते. राज ठाकरे यांनी सुरुवातीला या भेटी घेतल्या. पण आपल्याला या चोरटेपणात रस नाही, इच्छाच असेल तर देवाब्राह्मणांच्या साक्षीने उघडपणे हात मागा अशी भूमिका घेऊन त्यांनी भाजपची मुस्कटदाबी केली. तसा हात मागायचा तर दुसऱ्या हाती शिवसेनेचा हात आहे, त्याचे काय करायचे याचा निर्णय भाजपस घ्यावा लागला असता. तो घ्यायची त्यांची तयारी आहेही. परंतु त्यांच्यासाठी ही वेळ अडचणीची आहे. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर एकेक खासदार जोडावा अशी गरज असताना आहे, त्यांतून कोणाला कमी करणे त्यांना परवडणारे नाही. ही भाजपची अडचण राज ठाकरे यांनी ओळखली आणि म्हणूनच भाजपला जाहीर पाठिंबा देऊन शिवसेनेच्या आणि भाजपच्या अडचणीत भर टाकली. न मागता दिल्या गेलेल्या या पाठिंब्यामुळे भाजपसमोर काही नाजूक प्रश्न निर्माण होतात.
उदाहरणार्थ ज्या मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार आहे तेथे उभ्या असलेल्या मनसे उमेदवाराशी भाजप कसा वागणार? या मनसे उमेदवारावर भाजपने समजा जोरदार टीकास्त्र सोडले तर तुम्हांस पाठिंबा देणाऱ्यावरच का टीका करता, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्याचे उत्तर भाजप कसे देणार? की सेनेच्या मतदारसंघात भाजप नेते प्रचारालाच जाणार नाहीत? याउलट अशीही परिस्थिती निर्माण होऊ शकते की मनसे उमेदवाराकडून िरगणातील शिवसेना उमेदवारालाच आपले लक्ष्य केले जाऊ शकते. तसे झाल्यास भाजप हा सेनेच्या मदतीस जाणार की मनसेच्या? त्याहूनही अधिक गंभीर प्रश्न असा की भाजपस राज ठाकरे यांनी देऊ केलेला पाठिंबा हवा आहे की नको? पाठिंबा हवा असे भाजप नेत्यांस वाटत असल्यास ते त्यानुसार मागणी करणार काय? आणि नको असल्यास तुमच्या पाठिंब्याची आम्हांस गरज नाही, असे राज ठाकरे यांना खडसावण्याची हिंमत भाजप दाखवणार काय? खरे तर असे करणे भाजपस शक्य नाही. कारण त्या पक्षाच्या काही नेत्यांनी राज ठाकरे यांच्या पाठिंब्याचे स्वागत करून टाकले असून त्यांना उलट सेनेच्या भावनेची फिकीर नाही, असे दिसते.
खरे तर या सगळय़ाचा अर्थ इतकाच की दिवसेंदिवस अशक्त होत चाललेल्या शिवसेनेपेक्षा तरण्या, चटपटीत मनसेचा मोह भारतीय जनता पक्षास पडू लागला असून तसे जाहीर म्हणण्याची हिंमत मात्र त्या पक्षाकडे अद्याप नाही. कदाचित लोकसभा निवडणुकांनंतरचा एकूण रागरंग लक्षात घेऊन भाजप ही आपली नवी गरज व्यक्त करणारच नाही, असे मानण्याचे कारण नाही. तोपर्यंत तरी नव्या भिडूच्या शोधात असलेल्या भाजपला एकतर्फी पाठिंबा देऊन मनसेने त्या पक्षाचा.. असून खोळंबा.. केला आहे, हे निश्चित.