खरंच विचार करा, नामच घेण्याचा आग्रह श्रीमहाराजांनी का केला? त्याचं उत्तर दोन बोधवचनांतून मिळतं. नामानं दोन गोष्टी घडतात. पहिली गोष्ट म्हणजे, ‘नामानं प्रपंचाचं खरं स्वरूप कळेल’ आणि दुसरी गोष्ट म्हणजे, ‘नामानं जे साधेल ते कायमचं असेल, कारण नामाने मुळापासून सुधारणा होईल.’ मुळातच बिघाड आहे म्हणून प्रपंचाचं खरं स्वरूप आपण जाणत नाही. मूळ म्हणजे परमात्मा आणि मूळ म्हणजे  त्या परमात्म्यापाठोपाठ सावलीसारखी आलेली मायादेखील! आपण मायेला सन्मुख आणि परमात्म्याला विन्मुख आहोत म्हणून मायेच्या प्रपंचातच आपल्याला गोडी वाटते. त्या प्रपंचाची अशाश्वतता आपल्याला उमगत नाही. स्वार्थाच्या पायावर उभारलेल्या प्रपंचात आपण स्वार्थ सोडत नाही  पण दुसऱ्याकडून नि:स्वार्थ प्रेमाची कशी अपेक्षा करतो, हे जाणवत नाही. मोह, भ्रमाच्या प्रभावानं त्यात आपण कसे रुततो, ते जाणत नाही. जो आज आहे तसा उद्या नसतो, अशा प्रपंचात आपलं मन अडकलं आहे. जो कधी ना कधी सोडायचाच आहे, तो मनातून सोडणं आपल्याला जड जात आहे. ही प्रक्रिया नामानंच घडेल. कारण नामानं प्रपंचाचं खरं स्वरूप उकलू लागेल आणि त्यातील आपल्या वावराकडे अलिप्तपणे पाहणंही साधल्यानं आपल्यातही सुधारणा होत जाईल. प्रपंचाचं खरं अशाश्वत रूप जाणवेल आणि मन अंतर्मुख, सूक्ष्म होत जाईल. मग अशाश्वत असा जो प्रपंच मी ‘माझे’पणानं करीत होतो तो श्रीमहाराजांच्या इच्छेवर सोपवून कर्तव्यापुरता मी त्यात राहीन. त्या प्रपंचातली चिंता, काळजी, अस्वस्थता सारं काही महाराजांच्या चरणीं वाहून मी माझ्या वाटय़ाला आलेली भूमिका पार पाडू लागेन. ‘आत्मारामा’त समर्थ सांगतात, ‘‘जितुकें कांहीं नासोन जाईल। जें अशाश्वत असेल। तुज समागमे न येईल। तितुकेंच द्यावे मज।।३२।।’’ जे नष्ट होणार आहे, अशाश्वत आहे, प्राण सोडताना तुझ्यासोबत येणारे नाही ते सारं काही मला देऊन टाक, असं सद्गुरू सांगतात. आता हे देणं आहे ते मनानंच आहे. त्यातली आसक्तीच देऊन टाकायची आहे. ती आसक्ती सोडल्यानं काय होईल? तर, ‘‘नाशिवंत तितुकेंचि देसी। तरी पद प्राप्त निश्चयेंसी। त्यामध्यें लालुच करिसी। तरी स्वहित न घडे।।३५।।’’ जे नाशवंत आहे त्याची ओढ मनात कायम राहिली, त्या अशाश्वताच्या ओढीचा त्याग झाला नाही तर मग खरे स्वहित घडणार नाही. जर ती ओढ देऊन टाकली तर जीव मूळ पदावर येईल, म्हणजेच परमात्म्याच्या स्वरूपाशी ऐक्य पावेल आणि परमसुख प्राप्त करील! जीवनात अशाश्वत काय आहे, याची ओळख नामात साधक जसजसा मुरत जाईल तसतशी होत जाईल. जे अशाश्वत आहे, त्यातील आसक्ती कशी अडकवते, याची जाणीव नामानंच तीव्र होईल. त्या आसक्तीचा त्याग मनातून करण्याची तळमळही नामानंच वाढीस लागेल. त्यासाठीच नामाकडे मनाला वळवलं पाहिजे. नामाचा सदोदित योग, सदोदित संग घडावा, असा प्रयत्न ठेवला पाहिजे. त्या नामाचं गूढ जाणून घेण्यासाठी आता श्रीगोंदवलेकर महाराज यांनी सांगितलेल्या ‘नामयोगा’कडे वळू.