रात्र फार झाली होती. आपलं बोलणं अगदी हळू आवाजात असलं तरी त्यानं डब्यातल्या प्रवाशांना जाग तर नाही ना येणार, हा विचार मनात डोकावल्यानं हृदयेंद्र थोडा अस्वस्थ झाला. त्याच्या चेहऱ्यावरील पालटलेली भावछटा जाणून अचलानंद दादांनी विचारलं..
अचलदादा- झोप आली का?
हृदयेंद्र- नाही.. मी या अभंगाचाच विचार करत होतो.. (दादांचं मन दुखवू नये म्हणून आपण खोटंच बोललोय, या जाणिवेनंही हृदयेंद्रला वाईट वाटलं खरं, पण अभंगावर लक्ष केंद्रित करीत तो पुटपुटला..) मरण हें पेरणें जन्म हें उगवणें। हे मायेची खूण जाणीतली।। संग तुझा पुरे संग तुझा पुरे। संग तुझा पुरे नारायणा।।.. दादा इथवर हा अभंग कसा एकसंध वाटतो. जन्ममरण चक्रामागे माया कारणीभूत आहे. एकदा का नारायणाचा, त्या सद्गुरूंचा सत्संग लाभला की त्या मायेचा निरास होईल, हेही समजलं, मग अचानक ‘तू तरी न मरें मी तरी न मरें’ हा खडखडाट कुठून आला?
अचलदादा- (हसतात) हा खडखडाट नाही? पहिले दोन चरण हा जणू पूर्वरंग आहे.. दुसरे दोन चरण म्हणजे उत्तररंग! पण त्याआधी सहजपणानं तुम्ही जो शब्द वापरलात.. सत्संग.. त्याचा खरा अर्थ जाणतो का हो आपण?
हृदयेंद्र – सत्संग म्हणजे सत्याचा संग..
अचलदादा- पण खरा संग म्हणजे तरी काय? चांगलं चुंगलं ऐकणं.. ते ऐकूनही आपल्यात कणमात्रदेखील बदल न होणं, याला सत्संग म्हणाल का तुम्ही?
हृदयेंद्र- नाही..
अचलदादा- पण आज जागोजागी असाच तर सत्संग थाटात चालतो. सत्संगाचाही इव्हेन्ट झालाय! ऐकणाऱ्यात फरक पडत नाहीच, पण अनेकदा सांगणाराही ऐकीव, पढीक गोष्टीच सांगत असतो! ‘या भांडय़ाला हात लावू नका, गरम आहे, चटका बसेल,’ असं कुणी सांगितलं तर आपण कसं ऐकतो? त्या भांडय़ाला हात लावतो का? (हृदयेंद्र नकारार्थी मान हलवतो) म्हणजे ऐकताक्षणी आचरणात आणतो ना? मग सत्संग का आचरणात येत नाही? कारण अंत:करणाला खरा चटकाच बसत नाही! सांगणारा सांगतो, ऐकणारा ऐकतो की जग म्हणजे मायाच आहे.. प्रपंचात मन अडकवू नका.. ‘सत्संग’ संपला की सांगणाराऐकणारा दोघंही प्रपंचात गुंतून जातात..
हृदयेंद्र- या ‘प्रपंच’ शब्दाचा फार सुंदर अर्थ सांगितला होता गुरुजींनी.. पाच ज्ञानेंद्रियं आणि पाच कर्मेद्रियं याद्वारे जगाकडे असलेली ओढ हाच खरा प्रपंच आहे! भल्या-भल्यांना हा प्रपंच सुटलेला नाही!
अचलदादा- जेव्हा सद्गुरूंचा संग खऱ्या अर्थानं साधेल ना, तेव्हाच मायेचा प्रभाव ओसरेल.. आता मला सांगा, मायेचा प्रभाव संपला, पण म्हणून जे जीवन शेष आहे ते संपेल का?
हृदयेंद्र- नाही.. जीवन जगावंच लागेल..
अचलदादा- पण ते जीवन मायेच्या अधीन असेल का?
हृदयेंद्र- नाही.. उलट किती भक्तिमय जीवन असेल!
अचलदादा- हाच या अभंगाचा उत्तररंग! आधी जीवन ‘मी’पणानं जगत होता.. तो ‘मी’ संकुचित होता.. आता जीवनातलं द्वंद्व संपलं.. अद्वैत उमलू लागलं, ‘तू’ नि ‘मी’ एक होणं, हे अद्वैत नव्हे.. ‘मी’ नाहीच केवळ ‘तू’च आहेस, हे खरं अद्वैत.. त्या अद्वैताकडे आंतरिक वाटचाल सुरू झाली. संकुचित ‘मी’ संपला, पण दास ‘मी’ उरला.. हे द्वैतसुद्धा उरू नये, ही तळमळ लागली.. हे सद्गुरो ‘तू’ आणि ‘मी’ हा भेद उरावा इतपतदेखील ‘मी’पणा नको, या तळमळीतला उद्गार आहे.. ‘तूं तरी न मरें मी तरी न मरें।’ पण यातून काय साधलं? तर प्रेमाभक्तीचा प्रारंभ! ‘भक्ति हे संचरे हाचि लाभू।।’ बघा हं ‘संचरे’! काय शब्द आहे.. भक्तीचा ‘संचार’.. भूतबाधेसाठी हा शब्द वापरला जाई किंवा एखाद्यात एखाद्या देवाचा संचार झालाय, असंही म्हटलं जाई.. थोडक्यात त्या देहावर बाह्य शक्ती ताबा घेते; तसा माझ्या या चित्त, मन, बुद्धी, देहाचा ताबा भक्तीनं घेतला आहे! पुढे विठा महाराज म्हणतात : हे केशवा मी ठाईच.. आहे त्या जागीच, संपून गेलो. ‘विठा म्हणे केशवा ठाईचा मी नेणें’..
हृदयेंद्र- ओ हो.. माउलीपण म्हणतात ना? ‘कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी..’
अचलदादा- अगदी बरोबर.. कापराची ज्योत उजळते आणि ठाईच समाप्त होते.. मागे काही पुरावाही नाही..
हृदयेंद्र- पेणचे भाऊ कापराचं हवन करीत.. मी एकदा म्हटलं, भाऊ कापूर हे हव्य-द्रव्य नाही म्हणतात ना? तर हसून म्हणाले, कापूर कसा ठाईच नष्ट होतो.. इतर हव्य द्रव्य.. तीळ-तांदूळ यज्ञपात्रात उरतात! कापूर कणमात्रही उरत नाही! उपासना तशी पाहिजे.. ‘मी केलं’ हा भावही कणमात्र उरता कामा नये.. तसं सद्गुरू भक्तीत ‘ठाईचा मी नेणे’ ही स्थिती आली पाहिजे!
संग्रहित लेख, दिनांक 12th Aug 2015 रोजी प्रकाशित
संचार
रात्र फार झाली होती. आपलं बोलणं अगदी हळू आवाजात असलं तरी त्यानं डब्यातल्या प्रवाशांना जाग तर नाही ना येणार, हा विचार मनात डोकावल्यानं हृदयेंद्र थोडा अस्वस्थ झाला.
First published on: 12-08-2015 at 05:39 IST
मराठीतील सर्व अभंगधारा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Communication