पक्षासाठी काही करावे अशी काँग्रेसमधील एकाही नेत्याची इच्छा नसल्याने त्या पक्षाची कथित कामराज योजना बारगळणारच होती. परंतु पक्षाला बळकटी आणण्यासाठी म्हणून काँग्रेसने केलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराची जी काही शोभा झाली तीमुळे पक्षाइतकेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचेही हसे झाले..

पृथ्वीराज चव्हाण मंत्रिमंडळाच्या कथित विस्तारावरून सरकार चालवणाऱ्या पक्षांची दिवाळखोरीच काय ती दिसून येते. गेल्या आठवडय़ात राष्ट्रवादीतर्फे मंत्रिमंडळात जितेंद्र आव्हाड यांची वर्णी लावण्यात आली तर काँग्रेसतर्फे सोमवारी अब्दुल सत्तार आणि अमित देशमुख यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. ही नावे पाहिल्यावर सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची काय केविलवाणी अवस्था आहे, याचा अंदाज यावा. काँग्रेस व राष्ट्रवादीत आता डावे-उजवे करण्यास फारशी काही संधी नाही. त्या पक्षांबाबत याला झाकावा आणि त्याला काढावा, असेही म्हणायची सोय नाही. कारण झाकणार कोणाला, हा प्रश्नच आहे. तेव्हा त्यांनी जे काही केले त्यास विस्तार असे म्हणावयाचे असेल तर त्यामागे केवळ संख्यात्मक विचार असावा. कारण राष्ट्रवादीने गुणात्मकतेचा विचार करून बराच काळ लोटला. परंतु काँग्रेसची अवस्था त्यांच्यापेक्षा वाईट. राष्ट्रवादीचे श्रेष्ठी तरी निदान येथील आहेत. काँग्रेसला तेही सुख नाही. त्या पक्षाने विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर विस्तार करून करून केले काय आणि मंत्रिमंडळात घेतले कोणाला? तर सत्तार आणि देशमुख यांना. जणू या दोघांच्या समावेशामुळे पक्षामध्ये नवचैतन्यच पसरणार. बरे, या दोन नावांच्या समावेशाबाबतही पक्षाने इतका गोंधळ घातला की विचारता सोय नाही. पक्षात अनेक गुणवान हिरेमाणके पसरलेली आहेत आणि त्यातून दोघांचीच निवड करणे जिकिरीचे आहे, अशी स्थिती आहे म्हणावे तर तेही नाही. तरीही दोन तुलनेने नगण्य नावांवर एकमत होण्यात काँग्रेसला घडाभर तेल खर्ची घालावे लागले. यातील सत्तार यांचा समावेश झाला तो म्हणे अशोक आदर्श चव्हाण यांच्या दबावामुळे. अशोक चव्हाण यांनी कोणत्या नैतिक अधिकाराच्या जोरावर हा दबाव आणला हे काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी नाही तरी निदान उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जनतेस सांगावे. आदर्श प्रकरण किंवा स्मार्ट म्हणवून घेणाऱ्या वर्तमानपत्रांच्या साहय़ाने त्यांनी मारलेला अशोकवनातील फेरफटका काँग्रेस नेतृत्वाच्या दृष्टिकोनातून अशोक चव्हाण यांच्या जमेच्या बाजूंत गणला जातो काय? या दोन उद्योगांखेरीज आपल्या समर्थकाच्या मंत्रिमंडळ सहभागासाठी दबाव आणावा असे कोणते भव्यदिव्य कृत्य अशोक चव्हाण वा त्यांचे अनुयायी सत्तार महाशयांच्या नावावर आहे? अमित देशमुख यांच्याबाबतही हे विचारता येईल. त्यांचा मंत्रिमंडळातील सहभाग हा पक्षात अजूनही व्यापक पातळीवर देशमुखी कशी सुरू आहे, हे दर्शवणारा आहे.
या विस्ताराची जी काही शोभा झाली तीमुळे पक्षाइतकेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचेही हसे झाले. या आधी आदर्श अहवालाच्या मुद्दय़ावर पश्रेष्ठींनी त्यांच्यावर मान खाली घालायची वेळ आणलीच होती. या वेळी मंत्रिमंडळ विस्ताराचा मुद्दा श्रेष्ठींना मिळाला. नव्या मंत्र्यांचा शपथविधी पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार रविवारी दुपारी होणार होता. संबंधित खात्याने त्याबाबत अधिकृतपणे कळवलेही होते. परंतु ऐन वेळी तो रोखला गेला. का? तर संभाव्य मंत्र्यांच्या नावावर एकमत होत नाही म्हणून. हे दुमत होते ते प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि मुख्यमंत्री चव्हाण यांच्यात. ही मतभेदाची भेग आणखी कशी वाढेल यासाठी पक्षाध्यक्षांचे सल्लागार अहमद पटेल यांनी काहीच प्रयत्न केलेच नसतील असे मानणे दुधखुळेपणाचेच ठरावे. पटेल काय किंवा चव्हाण वा माणिकराव काय. ही सर्व दरबारी राजकारणात मुरलेली माणसे. जनमानसात त्यांना काहीही स्थान नाही. यांतील मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना नैतिक स्वच्छतेचे तरी गुण देता येतील. अन्य दोघांबाबत तेही शक्य नाही. स्वत: ठाकरे हे मंत्रिमंडळात समावेश व्हावा यासाठी उत्सुक होते म्हणतात. त्यात नवीन काही नाही. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षास मंत्री होण्याची आस असते आणि सोनिया गांधी यांच्या सचिवास काळजी असते स्वपक्षीय मुख्यमंत्र्यास कसे आडवे घालता येईल याची. वर्षांनुवर्षे हे असेच सुरू आहे. या अशा वागण्याने या मंडळींनी जेवढे पक्षाचे नुकसान केले आहे तेवढे राजकीय विरोधकांनादेखील जमले नसावे. त्यामुळे अहमद पटेल ज्या गुजरातमधून येतात त्या गुजरातेत काँग्रेस औषधालाही शिल्लक नाही. तरीही त्याची काहीही चाड वा खंत ना पटेल यांना ना त्यांना नेमणाऱ्यांना. जो कोणी पक्षात त्यातल्या त्यात बरे काम करीत असेल त्याचे पाय कापणे हाच त्यांचा कार्यक्रम राहिलेला आहे. खेरीज पक्षाचे दुर्दैव हे की या अशा शुंभांना बाजूला सारून थेट जनतेशी संवाद साधावा इतका वकूब सोनिया गांधी यांचा नाही आणि राहुल गांधी यांना तर काहीही सुधरतच नाही अशी परिस्थिती. अशा वातावरणात काही करू इच्छिणाऱ्याची नेहमीच फरफट होते. दिल्लीत मनमोहन सिंग यांचे हेच झाले आणि महाराष्ट्रात आता पृथ्वीराज चव्हाण तेच अनुभवत आहेत. या आधी मंत्रिमंडळातील ज्येष्ठांना पदत्याग करावयास लावून पक्षासाठी कामराज योजना आणली जाणार असल्याचे सांगितले जात होते. दिवंगत नेते कामराज यांच्याप्रमाणे या ज्येष्ठांना पक्षविस्ताराच्या कामाला जुंपले जाणार होते, म्हणे. अशा या कामराजीय मंत्र्यांत पतंगराव कदम, नारायण राणे, राधाकृष्ण विखे पाटील आदींची नावे होती. म्हणजे ही त्यातल्या त्यात मातबर मंडळी मंत्रिपदाचा त्याग करून पक्षकार्यासाठी झोकून देणार असा त्याचा अर्थ. परंतु त्या बातमीत तेव्हाही काही तथ्य नव्हते आणि पुढेही असणार नाही. याचे कारण असे की पक्षासाठी म्हणून काही करावे अशी काँग्रेसमधील एकाही नेत्याची इच्छा नाही. तसे काही करायचे तर जनता संपर्क लागतो आणि जनतेच्या प्रश्नांची जाण असावी लागते. मंत्रिमंडळातील एकाही मंत्र्यास जनतेच्या प्रश्नाशी काही घेणे-देणे आहे, असे म्हणता येणार नाही. त्यांचा जनता संपर्क तुटून बराच काळ लोटला. या काळात हे सर्व दिग्गज म्हणवून घेणारे काँग्रेसजन राजकारण करायचेच विसरून गेले आहेत. आता त्यांचे उद्योग चालतात ते एक तर स्वत:च्या पोराबाळांची वर्णी कशी आणि कोठे लावता येईल यासाठी किंवा इतक्या वर्षांच्या सत्ताआधारे स्थापन केलेल्या संस्थांसाठी आणखी काय लुबाडता येईल यासाठी. राजकारणात जनतेचा काही किमान विचार तरी करावयाचा असतो, याचा पूर्ण विसर या काँग्रेसी मुखंडांना पडलेला असून पक्षासाठी म्हणून अंगाला काही तोशीस लावून घेण्याची त्यांची सुतराम इच्छा आणि तयारीही नाही. मुख्यमंत्र्यांविरोधात काही ज्येष्ठ मंत्री नाराज असल्याचे सांगितले जाते. ते खरेही असेल. परंतु या ज्येष्ठांच्या नाराजीचे कारण त्यांच्या पोराबाळांच्या निवडणूक पराभवांत आहे. ताज्या लोकसभा निवडणुकांत नरेंद्र मोदी लाटेने अनेक काँग्रेस ज्येष्ठांचा पालापाचोळा झाला. ती लाट एवढी जबरदस्त होती की या पोराबाळांच्या ऐवजी हे नेते जरी उभे राहिले असते तरी त्यांना धूळ खावी लागली असती. छगन भुजबळ याबाबत अधिकारवाणीने बोलू शकतील. तेव्हा या नेतेमंडळींना या वास्तवाचे भान नसेल असे नाही. परंतु ते समजून घेण्याची त्यांची इच्छा नाही.
त्यामुळे काँग्रेस पक्षास सध्या पाठीराखे कमी आणि नेते जास्त अशी अवस्था आली आहे. हे नेते अंग झटकून आणि आपले मानमरातब बाजूला ठेवून जोपर्यंत कामाला लागत नाहीत तोपर्यंत या असल्या फुटकळ विस्तारामुळे काँग्रेसचे काहीही भले होणार नाही.