News Flash

सुताचा पीळ आणि बहुपदरी सूत

कापूस, लोकर, पॉलिस्टर यांसारख्या तंतूपासून जेव्हा सूत तयार केले जाते, तेव्हा सुताला बळकटी येण्यासाठी पीळ दिला जातो. पीळ देताना तो एका विशिष्ट दिशेने दिला जातो.

| July 13, 2015 02:00 am

कापूस, लोकर, पॉलिस्टर यांसारख्या तंतूपासून जेव्हा सूत तयार केले जाते, तेव्हा सुताला बळकटी येण्यासाठी पीळ दिला जातो. पीळ देताना तो एका विशिष्ट दिशेने दिला जातो. इंग्रजीमध्ये ‘यस’ अक्षराच्या मधल्या भागाला समांतर दिशेला दिलेला पीळ ‘एस’ प्रकारचा पीळ म्हणून संबोधला जातो. तर इंग्रजी ‘झेड’ अक्षराच्या मधल्या भागाच्या समांतर दिशेला दिलेला पीळ ‘झेड’ पीळ म्हणून ओळखतात. बहुतेक वेळा कापडामधील उभ्या सुतापेक्षा आडव्या सुताला पीळ कमी असतो. कारण विणाई करताना उभ्या धाग्यावर पडणारा ताण हा आडव्या धाग्यावर पडणाऱ्या ताणापेक्षा जास्त असतो. कमी पीळ दिलेले सूत गुंफाईसाठी वापरले जाते. त्या सुताला ‘लो ट्विस्ट’ म्हणून संबोधले जाते. मध्यम पीळ असलेले किंवा सर्वसाधारण पीळ असलेले सूत विणाईसाठी वापरले जाते. त्याला नॉर्मल ट्विस्टचे सूत म्हणून ओळखतात. जास्त पीळ दिलेले सूत शिलाईकामासाठी वापरतात. त्या सुताची ओळख हाय ट्विस्ट अशी करून देतात. एका इंचात पीळ किती दिला आहे त्यावरून पीळ मोजतात. त्याला ‘टर्नस पर इंच’- टी.पी.आय. असे म्हटले जाते.

एकेरी सूत वापरण्याऐवजी काही कापडासाठी दुहेरी सुताचा वापर केला जातो. दुहेरी सूत तयार करताना एकेरी सुताचे दोन धागे एकत्र गुंडाळले जातात, गुंडाळताना त्याला थोडा पीळ दिला जातो. त्यामुळे दुहेरी सुताची मजबुती वाढते. अशा दुहेरी सुताचा वापर चादरी, टॉवेल, डस्टर वगरे प्रकारचे कापड विणताना उभ्या सुताकरिता करतात. असे दुहेरी सूत तयार करताना ४० नंबरचे दोन धागे वापरले असतील तर त्या सुताचे वर्णन २/४०२ अशा पद्धतीने केले जाते. त्याची जाडी ४० नंबर सुतापेक्षा जास्त असतेच, पण साधारणपणे २० नंबरच्या सुताएवढी असते. त्याचा सुतांकही २० नंबर सुताच्या जवळपास असतो.
दुहेरी सुतासारखे बहुपदरी सुताचा वापरही केला जातो. गुंफाईकरिता वापरले जाणारे सूत चार पदरी, सहा पदरी असे असतात. तसेच सतरंजी, ब्लँकेट या प्रकारच्या जास्त जाड कापडासाठीसुद्धा बहुपदरी धाग्यांचा वापर उभ्या आणि आडव्या दोन्ही प्रकारच्या धाग्यांसाठी केला जातो.

– महेश रोकडे (कोल्हापूर)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2015 2:00 am

Web Title: cotton textile
टॅग : Cotton,Textile
Next Stories
1 डॉ. भांडारकर आणि तुकाराम सोसायटी
2 ‘डिजिटल इंडिया’साठी २ वर्षे क्षमतावाढीची!
3 संघासाठी धर्म मोठा की देश?
Just Now!
X