ज्ञानेंद्रनं एकवार तिघा मित्रांकडे पाहिलं आणि त्याची दृष्टी खिडकीबाहेर पसरलेल्या जगाच्या पसाऱ्याकडे गेली. हिरवीगार शेतं.. ऐसपैस पाय पसरलेले डोंगर.. ओबडधोबड माणसं.. काही मातीच्या पायवाटेवरून चालत असलेली.. काही सायकलवरनं निघालेली.. काही शेतात राबणारी.. काही गुरं चारणारी.. मध्येच वस्त्या.. त्यातली लहान-मोठी, श्रीमंत-गरीब घरं.. धूळ माखलेले रस्ते.. हारीनं खेटलेली दुकानं.. मळकट भगवे झेंडे डोईवर घेतलेली एखाद-दोन मंदिरं.. नजर जाईल तिथं माणसंच माणसं आहेत. ज्याचं-त्याचं ‘जग’ आहे! या ‘जगा’तली प्रत्येक गोष्ट याच माणसांच्या भावविश्वातून तर साकारली आहे.. अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याच्या ओढीनं जो तो आपलं ‘जग’ घडवत तर आहे.. आणि या अशा भावसंपन्न चराचरात परब्रह्म व्याप्त आहे! किती विलक्षण भासतं हे सारं. डोळ्यांसमोरून वेगानं सरत असलेल्या दृश्याइतक्याच वेगानं मनात उमटत असलेल्या या विचारतरंगांत हरवलेला ज्ञानेंद्र आपल्याशीच बोलल्यागत म्हणाला..
ज्ञानेंद्र – केन उपनिषदातल्या त्या मंत्रात परब्रह्माचं वर्णन आहे..
हृदयेंद्र – परब्रह्म म्हणजे सद्गुरूच! श्रीगुरूगीतेतही भगवान शंकरही पार्वतीमातेला सांगतात, गुरुर्साक्षात परब्रह्म!
कर्मेद्र – बरं, काय वर्णन आहे परब्रह्माचं?
ज्ञानेंद्र – परब्रह्म कसं आहे? त्याला स्थूल इंद्रियांनी नाही जाणता येत.. हे चराचर विश्व आहे ना, त्याला आम्ही या हाडामांसाच्या शरीरातल्या ज्ञानेंद्रियांनी जाणतो.. त्याद्वारेच या जगाशी आमचा संपर्क आहे, संबंध आहे, संयोग आहे.. डोळ्यांनी आम्ही हे जग पाहातो.. कानांनी ऐकतो.. त्वचेनं स्पर्शतो.. पण या विश्वात कणाकणांत व्याप्त असलेल्या परब्रह्माला या इंद्रियांनी नाही जाणता येत! केन उपनिषदातला मंत्र सांगतो, ‘न तत्र चक्षुर्गच्छति, न वाक्  गच्छति, नो मन:!’ तिथे डोळे पोहोचत नाहीत, वाणी पोहोचत नाही, मन पोहोचत नाही! पुढचा मंत्र सांगतो, ‘अन्य देवतद् विदितादथो अविदितादधि’, म्हणजे ते ज्ञात आणि अज्ञाताच्या पलीकडे आहे..
हृदयेंद्र – पलीकडे.. पुन्हा ‘पैल’ आलाच!
ज्ञानेंद्र – पुढे फारच सुंदर आहे रे! जे वाणी व्यक्त करू शकत नाही, पण वाणी ज्यामुळे व्यक्त होते, जे डोळ्यांना दिसत नाही, पण ज्यामुळे डोळ्यांना दिसतं, जे कानाला ऐकता येत नाही, पण ज्यामुळे कान ऐकू शकतात.. यच्चक्षुषा न पश्यति येन चक्षूषि पश्यति। यच््रछोत्रेण न श्रुणोति, येन श्रोत्रमिदंश्रुतम्। तदेव ब्रह्मं.. तदेव ब्रह्मं! तेच ब्रह्म आहे.. तेच ब्रह्म आहे!!
या वाक्यासरशी ज्ञानेंद्रचं लक्ष पुन्हा खिडकीबाहेर गेलं.. दृश्यचौकट बदलली होती.. वस्ती बदलली होती.. माणसं बदलली होती, पण त्यांचं ‘जग’ तेच होतं.. त्याच भावना, त्याच वासना.. तीच तळमळ, तीच कळकळ.. तेच धैर्य, तीच भीती.. तीच करुणा.. तोच त्याग, तोच भोग.. तोच स्वार्थ, तोच परमार्थ..तदेव ब्रह्मं.. तदेव ब्रह्मं.. विचारांच्या लाटा उसळल्या आणि ज्ञानेंद्रचे डोळे किंचित पाणावले.. अगम्य पण उदात्त असं काहीतरी मनाच्या कवाडांवर धडकत होतं.. ते शब्दांत व्यक्त होत नव्हतं.. तिघेही त्याची ती भावमुद्रा पाहून मुग्ध झाले होते. कातर स्वरात हृदयेंद्रनं मौनाचा भंग केला..
हृदयेंद्र – फार सुंदर! डोळे ज्याला पाहू शकत नाहीत, पण डोळे ज्याच्यामुळे पाहातात.. त्याला पाहायचं तर डोळ्यापलीकडेच जावं लागेल ना? पण हे डोळे तर अशाश्वतात गुंतले आहेत.. त्यांना तिथली दृष्टी वळवावी लागेल.. पलीकडे पाहावंच लागेल.. प्रत्येक इंद्रियाला असं पैलतीरी वळावंच लागेल!
योगेंद्र – ते परब्रह्म या शरीरगत इंद्रियांनी जाणिवेच्या आवाक्यात सुरुवातीला नसेलही पण या इंद्रियांशिवाय आणि या शरीराशिवाय दुसरं साधन तरी या घडीला आपल्याकडे कुठे आहे? त्याचाच आधार प्रथम घ्यावा लागेल.. या इंद्रियांचं ध्येयच त्या दिशेनं वळवावं लागेल, नाही का?
ज्ञानेंद्र – कावळा दारावर ओरडतो ना? खिडकीत ओरडतो ना? ही इंद्रियं म्हणजेही तर दारं-खिडक्याच आहेत! तिथून जग ‘आत’ येतं! त्या प्रत्येक इंद्रियद्वाराशी सद्बुद्धीचा कावळा ओरडत आहे! पैल तो गे काऊ कोकताहे..!
चैतन्य प्रेम