युती तोडल्याची बातमी गुरुवारी समजली तेव्हा वाईट वाटले. पण यातून भाजपला किती मस्ती चढली आहे याची जाणीवसुद्धा झाली. युती तोडणे हा त्यांच्या धोरणाचाच भाग होता हेही समजले.  लोकसभेतील यशाने भाजपच्या नेत्यांच्या डोक्यात यशाची हवा शिरली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची वस्तुस्थिती हे लोक विसरले आहेत. त्यांना असा भ्रम झाला आहे की वेगळे लढल्यावर आपल्याला सर्वाधिक जागा मिळतील. पण हा त्यांचा भ्रम महाराष्ट्रातील जनता दूर करेलच.
मोदी व अमित शाह ही भाजपची जोडगोळी आपला एकाधिकारशाहीचा कारभार राज्यातसुद्धा आणू पाहतेय. लोकसभेत लोकांनी मोदींना भरभरून मतदान केले, कारण लोकांना बदल हवा होता. पण राज्यातसुद्धा लोक मोदींच्या नावावर मतदान करतील अशी आशा करणे पूर्णपणे मूर्खपणाचे आहे. शिवसेनेने लोकसभेतील विजयात मोदी फॅक्टर मान्य करून विधानसभेसाठी आपल्या कोटय़ातल्या २० जागा भाजप आणि मित्रपक्षांना दिल्या. यात परत भर घालून अजून तीन जागा सोडल्या.  परंतु भाजपने त्यांच्या कोटय़ातली एकही जागा  मित्रपक्षांना सोडली नाही आणि एवढे शिवसेनेने करून भाजपने माध्यमातून अशी ओरड सुरूकेली की शिवसेना सन्मानाची वागणूक देत नाही. हा भाजपचा दुटप्पीपणा होता. शेवटी भाजपने आडमुठी भूमिका घेऊन शिवसेनेबरोबरची २५ वर्षांची युती तोडली.  म्हणजे लोकसभेच्या यशाने भाजपला आता मित्रपक्षांची गरज उरली नाही. हरियाणात जे केले तेच महाराष्ट्रातही केले.  या सर्व घटनांमुळे लोकांमध्ये भाजपविरोधी संताप वाढलेला दिसतो. ज्या वेळी युती तुटली त्यानंतर ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर शेअर झालेल्या प्रतिक्रिया पाहिल्या तर लक्षात येईल कीलोक आता कॉँग्रेस-राष्ट्रवादीला खाली आणण्याबरोबर भाजपची मस्ती उतरवायची भाषा करू लागलेत.

.. तर हे पाच वर्षांत काय करतील ?
युती फुटली आणि सेना-भाजपचे खरे स्वार्थी चेहरे समोर आले. आघाडीतल्या पक्षांनी आपली ओळख आधीच निर्माण केली होती. त्यांना मुहूर्त हवा होता तो ‘युतीतुटी’चा. तो मुहूर्त आला न आला तोच आघाडी धर्मही फुटला. याच मुहूर्ताची संधी साधून मनसेने ‘ब्लू िपट्र’ जाहीर करून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. घटक पक्षही आता चिरीमिरी वाटून घ्यायच्या नादात आहेत.
 हे सगळं जेव्हा घडत होतं तेव्हा हे सर्व पक्ष एक गोष्ट विसरले की जनता एवढी दूधखुळी नाही. गेल्या १५ वर्षांतील कारभार पाहता जनता कॉँग्रेस वा राष्ट्रवादीला थारा देणार नाही असं कालपर्यंत वाटत होतं. आता मात्र १५ दिवसांत असे तर पाच वर्षांत काय करतील हे, असे वाटू लागले आहे.
जनतेसमोर एक मोठा प्रश्न उभा झाला आहे.. मत कुणाला द्यायचं? सत्तेत राहून माजलेत त्यांना, की सत्तेसाठी हपापलेत त्यांना? जनतेने मतदान करताना निष्ठावादी राहू नये, कारण पक्ष त्याची कशी परतफेड करतो हे आपण बघितलंय.
– अमोल जनार्दन देसाई, गारगोटी, जि. कोल्हापूर</strong>

काहीही झाले तरी, लाभार्थी राष्ट्रवादीच!
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचे गेल्या काही दिवसांत प्रसिद्ध झालेले वृत्तान्त पाहता  असे वाटेल की या घटना म्हणजे केवळ नाइलाजास्तव झालेला युतीतील काडीमोड आणि आघाडीतील बिघाडी आहे. परंतु पवारसाहेबांच्या चतुर राजकारणाशी परिचित असलेल्या कुणालाही या घटनांमागचा सूत्रधार कोण असावा हे सहज उमगेल!
एरवी निवडणुकीच्या तोंडावर ऐन वेळी कधी नव्हे इतकी अडेलतट्ट आणि बेपर्वा भूमिका घेण्याइतके धाडस, तसाच भक्कम पाठिंबा असल्याशिवाय उद्धव ठाकरे खचितच दाखवू शकले नसते. साहेबांची ही खेळी शकुनीमामालासुद्धा राजकारणाच्या द्यूतात मागे टाकील अशी आहे. कारण या आघाडी- बिघाडीचा किंवा युतीविच्छेदाचा सगळ्यात मोठा लाभार्थी राष्ट्रवादी पक्षच ठरणार आहे यात काही संशय नाही! पवारांचा राष्ट्रवादी हा एकच पक्ष निवडणुकीनंतर कॉँग्रेस, शिवसेना, मनसे यांपकी कुठल्याही पक्षाबरोबर सरकार स्थापनेत सामील होऊ  शकतो, एवढेच नव्हे तर प्रसंगी भाजपलाही सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देऊ शकतो.  निवडणुकीत कोणीही जिंको किंवा हरो, राष्ट्रवादीची मात्र ती जीतच ठरावी अशी व्यूहरचना करण्यात पवारांनी सध्या तरी बाजी मारली असेच म्हणावे लागेल.
– राजीव मुळ्ये, दादर, मुंबई

प्राणिसंग्रहालयात ‘कॅमेराबंदी’ हवी..
‘फुशारकीला फटका’ हा ‘अन्वयार्थ’ (२५ सप्टें.) वाचला. विकास आणि वर्चस्वाच्या भुकेने हपापलेला माणूस आणि त्यामुळे विनाशाकडे वाटचाल करणारा निसर्ग हे विदारक सत्य आपण या निमित्ताने पुन्हा एकवार सर्वसामान्यांपुढे आणले आहे.  मुंबईच्या जिजामाता उद्यानातील  गेंडय़ापुढे तरुणाने उडी मारल्याने गेंडय़ाने त्याला धडका मारून ठार केल्याच्या घटनेचे दिल्लीच्या घटनेमुळे स्मरण झाले. मुळात प्रश्न असा, की असले ‘फुकाचे धारिष्टय़’ दाखविणारे लोक िपजऱ्याच्या अगदी जवळ किंवा जंगली प्राण्यांसाठीच्या मोकळ्या जागेत पोहोचतातच कसे?  
  वाघ, सिंह, अस्वल, गेंडा यांसारख्या श्वापदांना अत्यंत अपुऱ्या व बंदिस्त जागेत आपण ठेवतो हा त्यांच्यावर पहिला अन्याय होय. हे आणि अन्य िहस्र प्राणी कसे राहतात, कसे वागतात, शिकार कशी करतात आदी वन्य प्राणिजीवनाशी संबंधित महत्त्वपूर्ण बाबींचे जीव धोक्यात घालून केलेले चित्रण दूरचित्रवाहिन्यांवर पाहावयास मिळते. अशा प्राण्यांना बंदिवासात ठेवणे कितपत योग्य आहे?  यापुढे प्राणिसंग्रहालयात कॅमेरा नेण्यास मज्जाव करण्याबरोबरच प्राण्यांना खाऊ घालणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई केली पाहिजे.
– अनिल रा. तोरणे, तळेगाव दाभाडे

तरुणवर्गामुळे बँकेत कामांना गती
‘सुटय़ा हव्याच कशाला?’ हे पत्र (लोकमानस, २६ सप्टें.) वाचले. दिलीप जोशी यांचा बॅँक कर्मचाऱ्यांबद्दलचा आकसपूर्ण दृष्टिकोन खेदजनक वाटला. आजकाल बँक कर्मचाऱ्यांना नावे ठेवणे फॅशन झाले आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे आणि कामाच्या प्रचंड ताणामुळे पुरते हैराण झालेले कर्मचारी अशा सामाजिक हेटाळणीमुळे निराश होत आहेत. आज तरुण वर्गाला सर्वात जास्त रोजगार बँकांनी उपलब्ध करून दिला  हे खरे असले तरी, कामाचा ताण, व्यवस्थापनाकडून दिले जाणारे अवाजवी टार्गेट यामुळे नोकरी सोडणाऱ्या तरुणांची संख्याही वाढत आहे. बँकेत तरुणवर्ग आहेत म्हणून कामाला गती आली आहे. आधी टोमणे मारून मग कर्मचारी आमच्याशी नीट वागत नाहीत, अशी ओरड करणारे हेच लोक असतात. ‘तुम्हाला बसून काय काम असते’ असे म्हणतात आणि स्वत पाच मिनिटे रांगेत उभे राहू शकत नाहीत.
– सचिन पारवे, परभणी</strong>